कोयना धरणातून सिंचनासाठी आवर्तन सुरू

कोयना धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सिंचनासाठी लागणारी वाढती मागणी लक्षात घेऊन धरण पायथा वीजगृहासोबतच आता धरणाच्या सहा वक्री दरवाजांपैकी दोन वक्री दरवाजे एक फुटाने वर उचलून त्यातूनही पूर्वेकडे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.

कोयना धरणातून पूर्वेकडे सिंचनासाठी कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद एकूण 3 हजार 600 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. प्रशासनाकडून कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून पूर्वेकडे सिंचनासाठी प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. तथापि यापेक्षा सिंचनाची मागणी वाढल्याने सोमवारी सायंकाळी सहा वाजता धरणाच्या सहापैकी दोन वक्री दरवाजे एक फुटाने वर उचलून त्यातून 1500 व पायथा वीजगृहातून 2100 असे एकूण प्रतिसेकंद 3600 क्युसेक पाणी पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. दरम्यान, या सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे अचानकपणे नदीच्या पाणीपातळीत मोठय़ा प्रमाणावर वाढ लक्षात घेता प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.