कुंभमेळय़ाहून परतणाऱयांना क्वारंटाइन करणार! निर्बंध कठोर करण्याचा महापौरांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचा कहर सुरू असताना हरिद्वार येथे कुंभमेळ्यासाठी हजारो जणांनी गर्दी केल्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी जाऊन मुंबईत येणाऱया सर्वांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. शिवाय संचारबंदी असतानाही अनेक ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे निर्बंध आणखी कठोर लागतील असा इशाराही महापौरांनी दिला आहे.

ऑक्सिजन तुटवडय़ाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज विविध रुग्णालयांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गोवंडीचे शताब्दी रुग्णालय, बोरिवलीच्या भगवती रुग्णालयाचाही आढावा घेतला. कच्च्या मालाचा पुरवठा पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन निर्मितीमध्ये अडचणी येत असल्याचे पुरवठादारांचे म्हणणे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, नगरसेवक अनिल पाटणकर, नगरसेविका समृद्धी काते, डॉ. प्रदीप जाधव, डॉ. उषा शर्मा, डॉ. अलका माने आदी उपस्थित होते.

हँडी ऑक्सिजन वापर करा

ऑक्सिजनचा तुटवडा जाणवल्याने काही रुग्णांना जम्बो कोविड सेंटरमध्ये हलवले असल्याची माहितीही महापौरांनी दिली. ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे. तोपर्यंत रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी चार तासांपर्यंत चालणारे हँडी ऑक्सिजन वापरण्याचे निर्देशही यावेळी महापौरांनी दिले. तसेच या अडचणीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी लिक्विड स्वरूपातील ऑक्सिजन प्लांट बसवण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.