
1 मे रोजी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन शीघ्र कृती दलाचे 15 जवान मृत्यूमुखी पडले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असून यातून एका दुकानदाराने नक्षलवाद्यांना पोलिसांच्या ठावठिकाणाबद्दल माहिती दिली असल्याचं उघड झालं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यामध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आला होता आणि हा दुकानदार देखील याच तालुक्यातला असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे.
राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA ने गुरुवारी या स्फोटासंदर्भात आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये कैलास रामचंदानी नावाच्या आरोपीचाही समावेश आहे. या रामचंदानीने नक्षलवाद्यांना बॉम्ब बनवण्यासाठीचे साहित्यही पुरवले होते आणि जवानांच्या ठावठिकाण्याबाबतही माहिती दिली होती असं आरोपपत्रात म्हटलं आहे. रामचंदानी याचे कुरखेड्यामध्ये हार्डवेअरचे दुकान आहे. रामचंदानी हा नक्षलसमर्थक असून त्याने स्फोटासाठी वायर आणि इतर साहित्य नक्षलवाद्यांना मिळवून दिले होते. हा स्फोट घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांकडे स्फोटके आधीपासून तयार होती.
1 मे रोजी 15 जवान आणि त्यांना नेणारा चालक तोमेश्वर सिंघनाथ हे कुरखेडा-पुरादा रस्त्यावर झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडले होते. जांभूळखेडा-लेंडारी गावाजवळ हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. पोलिसांनी आतापर्यंत 8 नक्षलवाद्यांना याप्रकरणी अटक केली असून 4 नक्षलवादी हे फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये निर्मला कुमारी उर्फ नर्मदाक्का या कुख्यात महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे.
28 आणि 29 एप्रिलच्या रात्री नक्षलवाद्यांनी रस्त्यामध्ये स्फोटकं पेरली होती. हे नक्षलवादी पोलिसांच्या गाडीची वाट पाहात होते. दादापूर गावामध्ये नक्षलवाद्यांनी रस्ते बांधकामासाठीचं साहित्य जाळून टाकलं होतं आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. 1 मे रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांनी दादापूर गावात जाण्यासाठी सुरक्षित असल्याचं सांगितल्यानंतर शीघ्रकृती दलाचे जवान दादापूरकडे निघाले होते. कुरखेडा गावातून एका खासगी वाहनाने हे जवान दादापूरला जात होते.
रामचंदानी हा कुरखेडाचा रहिवासी असल्याने तो इथल्या पोलीस स्टेशनवर लक्ष ठेवून होता. हे सगळे जवान गाडीत बसल्याचं त्याने पाहिल्यानंतर नक्षलवाद्यांना त्याने फोन केला. दादापूरमधल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामुळे पोलीस कुरखेडा-पुरादा मार्गानेच जाणार हे त्याला माहिती होतं, त्याने तशी माहिती त्याच्या नक्षलवाद्यांना दिली होती. जवान कितीला निघाले, कोणत्या गाडीतून ते येत आहेत हे रामचंदानीनेच पोलिसांना सांगितलं. जेव्हा जवानांची गाडी स्फोटकांवर आली तेव्हा रस्त्याच्या कडेला लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. स्फोट घडवल्यानंतर नक्षलवादी तिथून पळून गेले.
एप्रिल 2018 मध्ये गडचिरोली पोलिसांनी 40 नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवले होते. याचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्यामध्ये जहाल नक्षलवादी नर्मदाक्का आणि तिचा नवरा किरण यांचा प्रामुख्याने समावेश होता. या दोघांनाही जून महिन्यात सिरोंचा बस स्थानकातून अटक करण्यात आली होती.

























































