
बिगारी महिलेला गवत कापण्यासाठी नेत तिच्या डोक्यात दगड मारून चाकूच्या धाकाने 61 हजारांचे दागिने लुटल्याची घटना 1 ऑगस्टला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कोंढव्यातील कानिफनाथ डोंगराजवळ घडली आहे. शारदा राठोड (वय 45, रा. कोंढवा) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी शारदा बिगारी कामासाठी कोंढव्यातील मजूर अड्डयावर थांबल्या होत्या. त्यावेळी आलेल्या एकाने त्यांना गवत कापण्यासाठी रोजंदारी ठरवून कामावर नेले. त्यानंतर दुपारी चोरट्याने शारदा यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील 61 हजारांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. याप्रकरणी आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांनी दिली आहे.


























































