
सातारा शहरातील एका महिला डॉक्टरला अनोळखी मोबाईल नंबरवरून डी गँगच्या नावाखाली खंडणीसाठी धमकीचा मेसेज आल्याने खळबळ उडाली आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास डॉक्टरसह कुटुंबीयांची हत्या करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गुरूवारी येथील एका महिला डॉक्टरला मोबाईलवर मेसेज आला. त्यामध्ये ‘इफ यू वोंट गिव्ह 80000 विल शूट यू अँड यूअर फॅमिली सून. दाऊद गँग’ असे इंग्रजीत म्हटले आहे. हा मेसेज वाचल्यानंतर त्या घाबरल्या. याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागे असलेल्या सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना मेसेजबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्राथमिक माहितीनुसार धमकीचा मेसेज असलेला मोबाईल क्रमांक परदेशातील असण्याची शक्यता आहे. पोलीस तपासानंतर याप्रकरणी माहिती मिळण्याची शक्यता आहे. जर मोबाईलद्वारे कोणालाही खंडणीचा मेसेज आला तर तत्काळ सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा दैनंदिन व्यवहारामध्ये वापर करत असताना नागरिकांनी जागरुक रहावे, असे आवाहन सातारा पोलीस दलातर्फे नागरिक, व्यवसायिक यांना करण्यात आले आहे.
























































