
सिनेवर्ल्ड नावाच्या सिनेमा कंपनीने ‘लेडी ऑफ हेवन’ नावाच्या चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेषित मोहम्मद पैंगबरांच्या मुलीवर बनविण्यात आलेल्या या चित्रपटाला विरोध केला जात होता. काही चित्रपटगृहांच्या बाहेर या चित्रपटाविरोधात आंदोलनेही करण्यात आली होती. या विरोधामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी सह्यांची एक मोहीम राबविण्यात आली होती. या मोहीमेत जवळपास 1 लाख वीस हजार लोकांनी भाग घेत चित्रपटाचे प्रदर्शन होऊ नये असं म्हणत सह्या केल्या होत्या.
ब्रिटनमधील बोल्टोन येथील मशिदींच्या संघटनेने ( The Bolton Council of Mosques ) या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. हा चित्रपट धार्मिक तेढ निर्माण करणारा आणि ईश्वराची निंदा करणारा असल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे. या संघटनेचे अध्यक्ष आसिफ पटेल यांनी सिनेवर्ल्ड कंपनीला ईमेल पाठवला होता, ज्यात त्यांनी म्हटलंय की ‘या चित्रपटात इतिहासातील गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. यामुळे इस्लामी इतिहासाशी निगडीत अनेक प्रतिष्ठीत मंडळींची बदनामी होत आहे.’
हाऊस ऑफ लॉर्डसच्या सदस्या क्लेअर फॉक्स यांनी या चित्रपटाला विरोध करणं चुकीचं असल्याचं म्हटलंय. चित्रपटाचे प्रदर्शन रद्द केले जाणे हे कलासृष्टीसाठी विनाशकारी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी धोकादायक असल्याचं म्हटलंय. इंग्लंडचे आरोग्यमंत्री साजिद जावेद यांनीही चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. बीबीसी हिंदीने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.


























































