
सामना प्रतिनिधी । महाड
सूर्यनारायणाची तेजस्वी प्रभा पसरत असतानाच रायगडावर तुताऱयांचा निनाद झाला. नगारा झडू लागला. ढोल-ताशांचा गजर झाला. संबळ कडाडले, तलवारी, भाले, जांबिया, कटय़ारींचा खणखणाट झाला. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून लोटलेल्या लाखोंच्या शिवसागराने केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या गगनभेदी गजराने अवघा रायगड किल्ला दणाणून गेला. निमित्त होते छत्रपती शिवरायांच्या 346 व्या दिमाखदार राज्याभिषेक सोहळय़ाचे. साडेतीनशे वर्षांपूर्वी राज्याभिषेकदिनी शिवरायांना मानवंदना देण्यासाठी इंग्रज, डच उपस्थित होते. आजच्या या दिमाखदार आणि देदीप्यमान सोहळय़ाचे साक्षीदार होण्यासाठी रायगडावर आवर्जून उपस्थित असलेल्या ग्रीस, चीन, पोलंड, बल्गेरिया आणि टय़ुनेशिया या पाच देशांच्या राजदूतांनी रयतेच्या राजाला मानाचा मुजरा केला. रायगडावर पुन्हा शिवकाळ अवतरला. वरुणराजानेही यावेळी शुभेच्छांचा जणू चिंब वर्षाव केला.




























































