विरोधकांना कधीही शत्रू किंवा देशद्रोही मानले नाही,लालकृष्ण आडवाणी यांची स्पष्टोक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

भाजपच्या विचारांशी सहमत नसलेल्यांना, विरोधकांना कधीही शत्रू किंवा देशद्रोही मानले नाही. असहमत असलेल्या पक्षांचा वा व्यक्तींचा आदर करत त्यांना भिन्न विचारांचे मानले असे स्पष्ट मत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केले. भाजपचा 6 एप्रिलला पक्षाचा स्थापना दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी एका ब्लॉगच्या माध्यमातून आपली मते मांडली. पक्षाची धोरणे आणि सिद्धांत यावर आडवाणी यांनी प्रकाश टाकला.

आडवाणी यांनी काय म्हटले आहे?

6 एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिन साजरा करत आहोत. हा भाजपमधील सर्वांसाठी महत्त्वाचा दिन आहे. भाजपच्या संस्थापकांपैकी एक असल्यामुळे देशातील जनता आणि पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांबरोबर माझ्या भावना व्यक्त करणे हे मी कर्तव्य समजतो. देशवासीय आणि पक्षकार्यकर्ते दोघांकडून मला आदर आणि प्रेम मिळाले आहे.

गांधीनगरच्या जनतेचे आभार मानतो. गांधीनगरच्या जनतेने नेहमीच प्रेम आणि पाठिंबा दिला. 1991 पासून सहा वेळा मला लोकसभेवर निवडून दिले.

14 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झालो तेव्हापासून माझ्यासाठी देशसेवा हे ‘पॅशन’ आणि ‘मिशन’ राहिले आहे. माझे राजकीय जीवन सुमारे सात दशके पक्षाशी जोडले गेले आहे. हे नाते अतूट आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी आणि अनेक उत्तुंग, प्रेरणादायी, निःस्वार्थी नेत्यांबरोबर काम करण्याचे भाग्य मला मिळाले.

विविधतेचा आदर आणि विचारस्वातंत्र्य हे हिंदुस्थानच्या लोकशाहीचे मूलतत्त्व आहे. भाजपच्या विचारांशी, धोरणांशी सहमत नसलेल्यांना, विरोधकांना भाजपने कधीही शत्रू, देशद्रोही किंवा देशविरोधी मानले नाही. अशा पक्षांचा किंवा व्यक्तींचा आदर करीत त्यांना भिन्न विचारांचे मानले. प्रत्येक नागरिकाला व्यक्तिगत किंवा राजकीय स्तरावर निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे हे भाजपने मानले.

http://blog.lkadvani.in/nation-first-party-next-self-last/

 

आडवाणी महान नेते; त्यांनी भाजपची योग्य व्याख्या केली – पंतप्रधान

लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या महान नेत्यांनी भाजपला बळकटी देण्याचे काम केले आहे. आडवाणी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून भाजपची खरी व्याख्या सांगितली आहे. विशेषतः ‘आधी देश, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ हा भाजपचा पथदर्शक मंत्र त्यांनी सांगितला आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. भाजपचा कार्यकर्ता असण्याचा मला अभिमान आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. आडवाणी यांच्या ब्लॉगचे कौतुक करतानाच पंतप्रधान मोदी यांनी ब्लॉगची लिंकही ट्विटरवर शेअर केली आहे.