माळशेज घाटात दरड कोसळली, दोन पर्यटक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी | ठाणे 

पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण असलेला कल्याण नगर महामार्गावरील माळशेजघाटात दरड कोसळुन यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. श्रध्दा पाटील व सुजाता सावंत असे जखमींची नावे असून सुजाता सावंत यांना आळेफाटा येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. दरड कोसळल्याने कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प झालेली आहे. पावसाळा आला की माळशेजघाटातील धबधब्यांच्या मनसोक्त आनंद लुटण्यासाठी शहरी भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र हा घाट म्हणजे मृत्यूची वाट बनला असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. घाटातील दरडी कोसळुन कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने धोकादायक ठिकाणी जाळ्या बसवलेल्या आहेत. यासाठी खुप खर्च करण्यात आला आहे.

चार दिवसापूर्वी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी माळशेजघाटात पर्यटकांना बंदी आदेश लागू केला होता. याची अंमलबजावणी स्थानिक प्रशासनाने केली का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पर्यटकांना ग्रामीण पोलिस व राष्ट्रीय महामार्ग पोलिस यांनी पायबंद घातला असता तर निदान हे दोन पर्यटक गंभीर जखमी झाले नसते. दरड कोसळल्याची माहिती मिळताच तहसिलदार सचिन चौधर, नायब तहसिलदार हनुमंत जगताप, टोकावडे पोलिस ठाण्याचे ए पी आय धनंजय पोरे, उपनिरिक्षक सागर चौहान हे माळशेजघाटात दाखल झाले असून ढिगारा उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.