ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई, कल्याणमध्ये ३४ कोटींचे हेरॉईन जप्त; मुख्य सूत्रधारासह ५ जणांना बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत ड्रग्स तस्करीचे कंबरडे मोडले आहे. पथकाने सापळा रचून कल्याण येथे तब्बल ९ किलो ७६.८ ग्रॅम वजनाचे सुमारे ३४ कोटी ९८ लाख ८४ हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार आणि सराईत गुन्हेगार अमजद युसुफ पठाणसह एकूण पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हेरॉईन साठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी दिली.

अमली पदार्थविरोधी पथक बुधवारी पहाटे कल्याण परिसरात गस्त घालत होते. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मांगरुळवाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन संशयित इसम पाठीवर बॅग घेऊन जाताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल ९ किलो २३६ ग्रॅम हेरॉईन आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थाची किंमत तब्बल ३२ कोटी ३२ लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय आरोपींकडून ३९ हजार रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली. या कारवाईत कासिम अब्दुल सत्तार कसाईकर (३८) आणि कृष्णा हजोमणी (३६) यांना अटक केली आहे.

मुंबईच्या अण्णालाही अटक

पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत आरोपी कासिम कसाईकरच्या शहापूर येथील घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान आणखीन १ कोटी ८५ लाख ८५ हजार रुपयांचा साठा जप्त केला. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अमजद पठाण (४७) हा मूळचा बैलबाजार कल्याण येथे राहणारा पोलिसांनी त्याला इगतपुरी येथून अटक केली. अमजद हा मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरातील गणेशान मुथुस्वामी थेवर उर्फ अण्णा (४९) याला हेरॉईन पुरवत असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अण्णालाही अटक केली.