
भोपाळ येथे देशातील पहिल्या वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशनचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हबीबगंज या नावाने ओळखलं जाणारे हे स्टेशन आता राणी कमलापती या नावाने ओळखलं जाईल. कमलापती या भोपाळच्या अखेरच्या हिंदू राणी होत्या, ज्यांनी शीलरक्षणासाठी जलसमाधी घेतली होती.
इसवी सन 1600 ते 1715पर्यंत गिन्नोरगढ किल्ल्यावर गोंड राजांचं अधिपत्य होतं तसंच भोपाळवरही ते शासक होते. गोंड राजा निजाम शाह याच्या सात राण्या होत्या. त्यातली सर्वात सुंदर राणी होती कमलापती. 16व्या शतकात सीहोर जिल्ह्यातील सलकनपूर संस्थानावर कृपाल सिंह सरौतिया नावाचा राजा राज्य करत होता. अतिशय उत्तम राज्यकारभार करणाऱ्या या राजाच्या पोटी एका मुलीचा जन्म झाला. तिचं सौंदर्य पाहून राजाने तिचं नाव कमलापति ठेवलं.
कमलापति लहानपणापासूनच बुद्धिमान, धाडसी होती. तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्याचसोबत घोडेस्वारी, मल्लयुद्ध, धनुर्विद्याही शिकली. ती युद्धशास्त्रात पारंगत असल्याने वडिलांसोबत युद्धात उतरत असे आणि शत्रुंवर वचक ठेवण्याचं काम करत असे. जेव्हा कमलापति वयात आली तेव्हा तिच्या सौंदर्याची ख्याती पसरू लागली. ती गेली सलकनपूरच्या बाडी किल्ल्याचा जमीनदाराच्या मुलाचा कानावर. याचं नाव होतं चैन सिंह. हा नात्याने कृपाल सिंहचा भाचा लागत होता. त्याने कमलापतीला मागणी घातली. मात्र, तिने त्याला नकार दिला.
काही काळाने कमलापतीचा विवाह भोपाळपासून 55 किमी दूर असलेल्या गिन्नौरगढ संस्थानचा राजपुत्र निजाम शाह याच्याशी झाला. तिला नवल शाह नावाचा मुलगाही झाला. पण, चैन सिंहच्या मनातून कमलापती गेली नव्हती. त्याला अजूनही तिच्याशी विवाह करायचा होता. त्याने अनेक वेळा निजाम शाहला मारण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यात तो अयशस्वी झाला होता. अखेर जेवणासाठी निमंत्रित करून त्याने निजाम शाहवर विषप्रयोग केला आणि त्याची हत्या केली.
निजाम शाहच्या हत्येनंतर त्याने कमलापतीला मिळवण्यासाठी गिन्नौरगढवर हल्ला केला. या हल्ल्यातून सुटून कमलापतीने निजाम शाहने तिच्यासाठी बांधलेल्या दूरच्या एका महालात आसरा घेतला. त्या दरम्यान चैन सिंहला रोखण्यासाठी कमलापती बेत आखत होती. तिच्या कानावर काही अफगाण्यांची माहिती आली. त्यांनी भोपाळची सीमा जिंकली होती आणि तिथे मुक्काम केला होता. या अफगाण्यांचा सरदार होता, दोस्त मोहम्मद खान. दोस्त पैसे घेऊन युद्ध करत असे. कमलापतीने त्याला एक लाख मोहोरा देऊन चैन सिंहला मारण्यास सांगितलं.
दोस्तने गिन्नौरगढवर हल्ला केला. या हल्ल्यात चैन सिंह मारला गेला आणि त्याने किल्ला काबीज केला. पण, दोस्त मोहम्मदला आता संपूर्ण भोपाळवर राज्य करायचं होतं. त्याने कमलापतीशी विवाह करण्याचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला. वास्तविक त्याला तिला आपल्या जनानखान्यात ठेवून घ्यायचं होतं. त्याचा हा कावा ओळखून कमलापतीने या विवाहाला नकार दिला. पण, तिचा 14 वर्षांचा मुलगा नवल शाह यावर चिडला आणि आपल्या 100 लढाऊ सैनिकांना घेऊन त्याने लालघाटी या ठिकाणी दोस्त मोहम्मदवर हल्ला केला. पण, या भीषण युद्धात नवल शाह मारला गेला. या युद्धात इतकं रक्त वाहिलं की त्यामुळेच या ठिकाणाला लालघाटी म्हटलं जातं.
ही परिस्थिती पाहून राणी कमलापतीने शीलरक्षणासाठी जवळच्या मोठ्या तलावाच्या धरणाचा दरवाजा उघडायला सांगितला. तिथून वाहणारं पाणी जवळच्या एका छोट्या तलावात जमा झालं. त्या तलावात कमलापतीने महालातील सर्व संपत्तीसह जलसमाधी घेतली. कमलापती ही अखेरची हिंदू राणी होती, जिने भोपाळवर राज्य केलं. तिच्या निधनानंतर भोपाळवर नवाबांचं राज्य सुरू झालं.


























































