
गानकोकिळा लता मंगेशकर यांना 28 दिवसांच्या उपचारानंतर ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. लतादीदींनी स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली. तसेच चाहत्यांचे आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले.
लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे 12 नोव्हेंबर रोजी ब्रीच कॅण्डीमध्ये अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या महिनाभरापासून त्यांच्याकर उपचार सुरू असल्यामुळे दीदींच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. गेल्या आठवडय़ात दीदी आयसीयूमधून बाहेर आल्यावर चाहत्यांना दिलासा मिळाला होता. आज तर दीदींनी आपल्या डिस्चार्जची बातमी देऊन सर्वांना खूश केले.
दीदींनी ट्विट करताना लिहिलंय, ‘नमस्कार, गेल्या 28 दिवसांपासून मी ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये होते. मला न्यूमोनिया झाला होता. माझी प्रकृती पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच घरी जावे अशी डॉक्टरांची इच्छा होती. आज मी घरी आले आहे. ईश्वर, माईबाबांचे आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे.’
लतादीदींनी उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचेही आभार मानले आहेत. ब्रीच कॅण्डीमधील डॉक्टर खरंच देवदूत आहेत. तेथील सर्व कर्मचारी खूपच चांगले आहेत. तुम्हा सगळ्यांची मी पुन्हा मनापासून आभारी आहे. हे प्रेम आणि आशीर्काद असाच राहाका, असे म्हणत दीदींनी डॉ. प्रतीत समधानी, डॉ. अश्विनी मेहता, डॉ. झरीर उदवाडिया, डॉ. निशित शाह, डॉ. जनार्दन निंबाळकर आणि डॉ. राजीव शर्मा या डॉक्टरांचे आभार मानले.


























































