लतादीदींच्या आठवणी…नवव्या वर्षी सोलापुरात गायले पहिले शास्त्रीय गायन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात सोलापुरातून केली होती. त्याबाबत खुद्द लता दीदींनी ट्विटरवर माहिती देत सांगितले होते. आपल्या वडिलांसोबत एका कार्यक्रमात त्या सोलापुरात आल्या होत्या. पाहिले शास्त्रीय गीताचे सादरीकरण हे सोलापुरात केले होते. दीनानाथ मंगेशकर यांच्यासमोर लता दीदींनी हट्ट धरून शास्त्रीय गीत सादर केले होते. 9 सप्टेंबर 1938 साली सरस्वती चौक येथील भागवत चित्रमंदिर येथे हा कार्यक्रम सोहळा झाला होता.

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे 9 सप्टेंबर 1938 रोजी सोलापुरात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजकांसोबत होत असलेली चर्चा लतादीदींनी ऐकली होती. त्यांनी वडील दीनानाथ मंगेशकर यांच्यासमोर मी देखील शास्त्रीय गीताचे सादरीकरण करणार असल्याचा हट्ट धरला होता. दीनानाथ मंगेशकर यांनी ‘अजून तू खूप लहान आहेस, मंचाकर गाण्यासाठी खूप काही शिकायचे आहे’, अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.

आयोजकांनीही मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना लता दीदींनी गीत सादरीकरण करावे, अशी विनंती केली. आयोजकांनी सोलापुरात ‘पिता—पुत्री का अनोखा जलसा, एक अनोखा शो’, अशी जाहिरात केली होती. या कार्यक्रमात लता दीदींनी ‘राग खंबावती’मध्ये एक रचना गायली आणि त्यानंतर वडिलांच्या लोकप्रिय नाटकांपैकी एक गाणेही गायले. श्रोत्यांनी त्यांच्या गायनाला भरभरून प्रतिसाद दिला होता.

सोलापूर महापालिकेने मानपत्र देऊन केला सन्मान

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा सोलापूर महानगरपालिकेने तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते 15 फेब्रुवारी 1994 रोजी सन्मान केला होता. गानसम्राज्ञी लतादीदींना मानपत्र देऊन सन्मान करणारी सोलापूर महानगरपालिका पहिलीच महापालिका आहे. सोलापुरातील पार्क चौक येथे मोठा कार्यक्रम घेऊन शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला होता. पवार यांच्या आग्रहास्तक लता दीदींनी ‘मोगरा फुलला’ हे गाणंही गायले होते. यावेळी कै. विलासराव देशमुख आणि तत्कालीन महापौर मनोहर सपाटे आदी मान्यवर उपस्थित होते.