
सामना प्रतिनिधी। लातूर
लातूर तालुक्यातील मौजे वांजरखेडा येथील संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष किरण मालपाणी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी रमेश कराड यांच्या उपस्थितीत लातूर येथे भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. वांजरखेडा येथील काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे बालेकिल्ल्यातच काँग्रेसला भगदाड पडले आहे.
वांजरखेडा येथील किरण मालपाणी, डिगंबर कदम, गणेश कदम, शहाजी कदम, श्रीनिवास काळे, केशव कदम, गणेश वाबळे, श्रीधर काळे, तानाजी कदम, रामदास कदम, श्रीनिवास कदम यांच्यासह अनेकांनी लातूर ग्रामीणचे भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लातूर येथे भाजपात जाहीर प्रवेश केला. यावेळी रमेशअप्पा कराड यांनी कार्यकर्त्यांना गमजा घालून त्यांचे भाजपात स्वागत केले.
यावेळी भाजपाचे जिल्हा चिटणीस बन्शी भिसे, लातूर पंचायत समितीचे गटनेते भैरवनाथ पिसाळ, शामसुंदर वाघमारे, समाधान कदम, विस्तारक दिलीप पाटील, गोविंद भोसले, बापुराव बिडवे, चंद्रकांत वांगस्कर, संतोश चव्हाण यांच्यासह अनेकजण उपस्थित होते































































