व्यापाऱ्याची बॅग लुटण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर शहरातील जुने गुळ मार्केट परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये शहरातील सराफा व्यापाऱ्यांची बॅग लुटण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना पोलिसांनी अटक केली. कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी लूट करण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे.

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सदर पथके गुन्हेगारांची माहिती संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 4 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, काही इसम जुने गुळ मार्केट परिसरातील असलेल्या वाहनाच्या पार्किंग परिसरामध्ये संशयितरित्या फिरत असून सराफ व्यापाऱ्याची सोन्याच्या दागिन्याची बॅग लुटण्याच्या तयारीत आहेत. अशी बातमी मिळाली . पोलीस पथक तात्काळ जुना गुळ मार्केट पार्किंग येथे पोहोचून कळवलेल्या वर्णनाच्या माहितीवरून पार्किंग परिसरात संशयितरित्या थांबलेल्यांना ताब्यात घेतले.

संतोष अशोक पटेकर (26) राहणार आम्रपाली नगर,कॅनल रोड, उपनगर जिल्हा नाशिक. निलेश उर्फ भारत उर्फ नाना बापू क्षीरसागर वय पंचवीस वर्ष राहणार आम्रपाली नगर, कॅनल रोड, उपनगर जिल्हा नाशिक. ज्ञानेश्वर शरद पोतदार, वय (31), राहणार खोरी गल्ली, लातूर. अक्षय लक्ष्मण महामुनी, वय 28 वर्ष, राहणार 5 नंबर चौक, पंचवटी नगर, लातूर. यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा कट उघडकीस आला. त्यांच्या ताब्यात असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये लोखंडी तलवार, एक लोखंडी बतई व एक दातऱ्या असलेला धारदार विळा मिळून आला.

काही सराफा व्यापारी सकाळी आपले वाहन पार्किंग मध्ये लावून सोन्याच्या दागिन्याची बॅग दुकानात घेऊन येतात व परत संध्याकाळी ती बॅग घरी घेऊन जातात हीच संधी साधून,अंधाराचा फायदा घेऊन सराफा व्यापाऱ्याची सोन्याच्या दागिन्याची बॅग लुटण्याचा कट करुन त्यासाठी लातूर येथील दोघांनी चार ते पाच दिवसापूर्वी त्यांच्या ओळखीच्या नाशिक येथील आणखीन दोघांना बोलावून घेऊन तीन-चार दिवसापासून पार्किंग परिसराची रेकी करत होते . रात्री एका सराफा व्यापारी सोन्याच्या दागिन्याची बॅग घरी घेऊन जात असताना अंधाराचा फायदा घेऊन शस्त्राचा धाक दाखवून बॅग लुटणार होतो असे सांगून ज्ञानेश्वर पोतदार व अशोक महामुनी यांना देणे झाल्याने व ते कर्जबाजारी झाल्याने आर्थिक विवंचनेतून,अडचणीमुळे पैसे मिळवण्यासाठी सदरचा प्रकार केल्याचे कबूल केले. त्यावरून नमूद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अमलदार सुधीर कोळसुरे यांचे फिर्यादीवरून पोलीस ठाणे गांधीचौक येथे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास गांधी चौक पोलीस करीत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, संतोष खांडेकर, प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.