
लातूर जिल्ह्यामध्ये सध्या सर्वत्र पाऊस होत आहे. या पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काढणीस आलेले सोयाबीन पुन्हा शेतातच उगवून येण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. मागील 24 तासात लातूर जिल्ह्यात 12.5 मि.मी. सरासरी पाऊस झाला. जिल्ह्यात आजपर्यंत 816.7 मि.मी. सरासरी पाऊस झालेला आहे.
लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून दररोज पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतीतील कामे बंद पडलेली आहेत. काढणीस आलेले सोयाबीन पुन्हा तिथेच उगवते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सोयाबीनच्या पिकात पाणी असल्याने सोयाबीन काढण्यासाठी मजूर चिखलात उतरण्यास तयार नाही, अशी स्थिती सर्वत्र आहे.
जिल्ह्यात मागील 24 तासात झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे हे आजपर्यंत झालेल्या पावसाची आहेत. लातूर तालुका – 11.2 मि.मी. (850.2 मि.मी.), औसा – 36.4 मि.मी. (729.5 मि.मी.), अहमदपूर – 0.9 मि.मी. (869. मि.मी.), निलंगा -19.2 मि.मी. (804.2 मि.मी.), उदगीर – 4.1 मि.मी. (818.5 मि.मी.), चाकूर – निरंक (825.1 मि.मी.), रेणापूर – 5.7 मि.मी. (795 मि.मी.), देवणी – 11.5 मि.मी. (840.8 मि.मी.), शिरुर अनंतपाळ – 16.9 मि.मी. (848.2 मि.मी.), जळकोट – 8.7 मि.मी. (869.9 मि.मी.).
देवंग्रा येथे पुलावरून पाणी
देवंग्रा येथे ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. देवंग्रा गावातील काही शालेय विद्यार्थी बाहेरगावी शाळेला आहेत. ते विद्यार्थी ओढ्याच्या पलीकडे होते. गावातील तरुणांनी त्या विद्यार्थ्यांना खांद्यावर, कोणी त्यांच्या हाताला धरून त्यांना ओढ्याच्या अलीकडे आणले. ज्ञानेश्वर मोरे, दत्ता बोयणे, लक्ष्मण धुमाळ, ज्योतीराम माने, तानाजी धुमाळ, ज्ञानेश्वर साठे या तरुणांनी विद्यार्थ्यांची मदत केली. ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.
औसा तालुक्यातील उटी बु. परिसरात सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू होता. तावरजा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सकाळी 2 दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडून देण्यात आले. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरातील गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु. परिसरात रात्री जोरदार पाऊस झाला त्याचप्रमाणे आजही संततधार पाऊस सुरूच होता. निलंगा शहरातही सकाळपासून थांबून थांबून पाऊस येत होता. निलंगा तालुक्यातील देवंग्रा व पानचिंचोली परिसरात चांगला पाऊस सुरू आहे.
निलंगा तालुक्यातील कलमुगळी, ताडमुगळी येथे जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावरुन वाहणाऱ्या पाण्याने रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथे आज जोरदार पाऊस सुरू होता. त्याचप्रमाणे शिरुर ताजबंद परिसरातही रिमझिम पाऊस सुरू असल्याने शेती कामे ठप्प झाली होती. औसा तालुक्यातील जवळगा, हारेगाव, दापेगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू असून हारेगाव येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने सास्तूर – औसा हा मार्ग बंद होता. देवणी तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस सर्वत्र सुरू होता. लातूर तालुक्यातील तांदुळजा येथे मुसळधार पाऊस सुरू होता.


























































