
लातूर शहरातील बाबा नगर खाडगाव रोड भागात सख्ख्या भावानेच चाकुने भोसकून निर्घृनपणे खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून खून करणाऱ्या मुलाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात लक्ष्मी सुभाष आलाकुंटे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा दोन नंबरचा मुलगा नितीन उर्फ रोहीत हा सतत दारू पिऊन घरातील सर्वांना भांडण तक्रार करीत असे. 8 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नितीन उर्फ रोहित आणि राहूल यांच्यामध्ये जोरदार भांडण तंटा झाला. राहूल याने चाकुने भोसकून नितीन उर्फ रोहीत ला गंभीर जखमी केले.
गंभीर जखमी अवस्थेमध्ये लक्ष्मी आलाकुंटे यांनी उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना 9 ऑक्टोबर रोजी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास नितीन उर्फ रोहित हा मरण पावला. भावाचा खून केल्याप्रकरणी राहूल सुभाष आलाकुंटे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































