
प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस याला कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी दोषी मानत न्यायालयाने पोटगी देण्याचे निर्देश दिले आहेत. वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्याची लिव्ह इन पार्टनर रिया पिल्ले हिला प्रति महिना एक लाख रुपये पोटगी स्वरुपात देण्याचे आदेश पेसला दिले आहेत.
रिया आणि लिएंडर हे जवळपास आठ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्या वादाची ठिणगी पडली आणि रियाने पेसविरोधात 2014मध्ये कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. लिएंडरने आपला शारीरिक, मानसिक, शाब्दिक आणि आर्थिक छळ केला असून त्यामुळे आपल्याला प्रचंड त्रास झाल्याची तक्रारी रियाने केली होती.
तर दुसरीकडे, रियाच्या पहिल्या लग्नाबाबत तसंच तिच्या सद्य परिस्थितीतील वैवाहिक स्थितीबाबत आपल्याला कल्पना नसल्याचा दावा पेसच्या वतीने करण्यात आला होता. अभिनेता संजय दत्त याच्यासोबत तिचा पहिला विवाह झाला होता. त्यानंतर त्यांनी घटस्फोटाचा दावा दाखल केल्याचा युक्तिवाद पेसकडून करण्यात आला होता. तर रियाच्या पक्षाने या दाव्याचं खंडन केलं होतं.
वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात महानगर दंडाधिकारी कोमल सिंह राजपूत यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. त्या निकालाची प्रत उपलब्ध झाली असून त्यात या प्रकरणी कोर्टाने लिएंडर याला दोषी मानलं आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, लिएंडर पेस याने कौटुंबिक हिंसाचार केल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे त्याने रिया हिला प्रतिमहिना एक लाख रुपये पोटगी आणि 50 हजार रुपये घरभाडं या स्वरुपात द्यावेत. तसंच, जर रियाला लिएंडरसोबत राहायचं असेल तर तिला ही रक्कम मिळणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.



























































