अकोले – विद्यार्थ्यांविना बंद असलेल्या शाळेत वावरतोय बिबटया

leopard

राज्यासह जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शाळा, कॉलेज अद्यापि बंद ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांविना सुनसान असलेल्या शाळांमध्ये आता चक्क बिबटय़ा फिरू लागला आहे. अकोले तालुक्यातील नवलेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अमृतनगर व कॉलेज परिसरात बिबटय़ा दिसला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शहराच्या आसपास आता बिबटय़ाचे दर्शन घडत आहे. भक्ष्याच्या शोधात बिबटय़ा शहरी अथवा ग्रामीण भागात येत असल्याचे दिसत आहे. रोहित संजय देशमुख नावाच्या व्यक्तीला अमृतनगर परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास बिबटय़ा दिसला. रोहितने दुचाकीचा हॉर्न वाजवल्यानंतर बिबटय़ा त्या ठिकाणाहून पळून गेला.

त्यानंतर या बिबटय़ाने आपला मोर्चा कॉलेज परिसराकडे वळवला. तेथे माजी प्राचार्य मोरे यांचे चिरंजीव हेमंत मोरे यांच्या दोन महिन्यांच्या पाळीव कुत्रीला बिबटय़ाने उचलून नेले. त्यांच्या बंगल्याजवळ बिबटय़ाचे स्पष्ट ठसे आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी हा बिबटय़ा सायंकाळी उशिरा गणपती मंदिर परिसरात आरामात फेरफटका मारत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान, बिबटय़ाचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या