
सामना ऑनालाईन, इगतपुरी
इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे भक्षाच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. वन विभागाच्या तीन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या बिबट्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात आले. ही घटना इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील शेतशिवारात रविवारी सकाळी उघडकीस आली. वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखालील वन पथकाने बिबट्याला सुरक्षित बाहेर काढले. पाऊस सतत सुरू असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले.
रविवारी सकाळी शेतमालक तुकाराम गाढवे शेतात गेले असता त्यांच्या कठडा नसलेल्या विहिरीत एक बिबट्या पडल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी ही माहिती वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना दिली. जाधव यांनी तातडीने वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांचे मार्गदर्शन घेत बिबट्याला बाहेर काढण्यासाठी अत्यावश्यक उपाययोजना सुरू केल्या.
इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांचे पथक तत्काळ बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने विहिरीमध्ये टाकलेल्या पिंजर्यात बिबट्या शिरताच त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तब्बल तीन तासांनंतर बिबट्याची सुटका करण्यात वन विभागाला यश आले. आवश्यक औषधोपचार करून नंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आले.


























































