रत्नागिरीत ग्रामस्थांवर हल्ले करणारा बिबट्या जेरबंद; बेहेरे येथे लावलेल्या पिंजऱ्यात अडकला

रत्नागिरी तालुक्यातील पावस-मेर्वी-गणेगुळे-कुर्धे-जांभूळआड या परिसरात गेल्या काही महिन्यात बिबट्याची दहशत निर्माण झाली होती. या मार्गाने प्रवास करणाऱ्या अनेकांवर बिबट्याने हल्ला केला होता. ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बेहेरे गावातील झाडीत वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात गुरुवारी सकाळी 7 वाजता बिबट्या अडकल्याचे दिसून आले.

पावस परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर होता. रस्त्यावरुन जाणाऱ्या ग्रामस्थांवर बिबट्या हल्ले करत होता. आतापर्यंत आठ जणांवर बिबट्याने हल्ले केले होते. काही गुरांनाही त्याने लक्ष्य केले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. बिबट्याला पकडण्यासाठी पावस, कुर्धे, मेर्वी परिसरात वनविभागाने पिंजरे लावले होते. त्याचबरोबर वनविभागाची गस्तही सुरु होती. मात्र, बिबट्या काही सापडत नव्हता.

गुरुवात सकाळी 7 वाजता पिंजर्‍याची पाहणी करायला गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बेहेरे याथील झाडीत लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे दिसले. त्यांनी ही गोष्ट परिवहन क्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांना कळवली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या बिबट्याची वैद्यकिय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बिबट्या झाडीमध्ये लपून हल्ले करत असल्यामुळे त्यावेळी परिसरातील झाडी साफ करण्यात आली होती. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना औषधोपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली होती. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्राची पाहणी करुन बिबट्याला जेरबंद करण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या