
थंडीच्या दिवसांत आपली त्वचा खूप कोरडी पडते. उन्हात फिरल्यामुळे, प्रदूषणामुळेसुद्धा काही वेळा त्वचा काळवंडते. यासाठी नियमितपणे त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचा मॉईश्चराईज करणे किंवा सनस्क्रीन वापरणे. त्वचेचे टॅनिंग जाण्यासाठी एखादा स्क्रब वापरणे असे घरगुती उपाय केल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार व्हायला मदत होते.
पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट करण्याऐवजी त्वचा कायम चमकदार आणि चांगली दिसावी यासाठी घरच्या घरी स्क्रब तयार करता येतात. घरी नैसर्गिक पद्धतीने केलेले उपचार सौंदर्यासाठी फायदेशीर ठरतात. मुख्य म्हणजे यामुळे कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. कमीत कमी खर्चात हे उपाय होत असल्याने पैशांचीही बचत होते. घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून अगदी 5 मिनिटांत हे स्क्रब तयार होते आणि आपल्याला हवे तेव्हा वापरता येतात पाहूया, त्वचा मुलायम आणि तुकतुकीत होण्यासाठी स्क्रब कसे तयार करायचे.
घरी स्क्रब तयार करायच्या स्टेप्स..
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये 2 चमचे साखर घ्या. त्यात 1 चमचा मध घाला. आता यामध्ये 1 चमचा खोबरेल तेल घाला. त्यानंतर यामध्ये 2 चमचे लिक्विड बॉडी सोप घाला. हे सर्व व्यवस्थित एकत्र करा आणि एका डबीत भरून ठेवा. ज्यावेळी हात, चेहरा, मान, पाय कांळवंडले आहेत असे वाटेल तेव्हा हे मिश्रण त्या भागावर लावा. त्यानंतर हळूवार हाताने स्क्रब करा. यामुळे त्वचा चमकदार, नितळ दिसेल. त्वचेवरचा मळ, काळेपणा निघून जाण्यासाठी हा चांगला उपयोग होईल.
























































