निरोगी आरोग्यासाठी प्या ‘गुळाचं पाणी’, वाचा तयार करण्याची पद्धत आणि फायदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुळामध्ये जीवनसत्त्व बी 1, बी6, सी, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम आणि खनिज, अशी अनेक पोषक तत्त्वे आढळतात. हिवाळ्यात वजन वाढ घटवण्याकरिता गुळाचे सेवन गुणकारी मानले जाते. गुळात नैसर्गिक गोडवा असल्यामुळे शरीराला याचा फायदा होतो, मात्र ज्यांना गूळ उष्ण असल्यामुळे सहन होत नाही, ते वेगळ्या पद्धतीने गुळाचे सेवन करू शकतात.

सध्या गुळाचा चहा बरेच जण पिऊ लागलेत, कारण हल्ली बऱ्याच जणांना साखर नको असतो. त्यामुळे त्याऐवजी गुळाचा चहा घेणं लोकं पसंत करतात. ज्यांना गुळाचा चहा आवडत नाही किंवा गुळाच्या चहाऐवजी गुळाचं गरम पाणीही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. याशिवाय गुळाचे पाणी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, योग्य प्रमाणात गुळाचे सेवन केल्यास, शरीरातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. पण अति प्रमाणात गुळाचे सेवन केले, तर मात्र वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वेळी गुळाच्या पाण्याची मदत घ्यावी.

– हिवाळ्यात वजन कमी करायचे असेल तर आपल्या डाएटमध्ये बदल करावा लागतो. वजन कमी करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये गुळाचा समावेश करून घेतलात तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. हिवाळ्यात गुळाचे पाणी प्यायलाने शरीराला उष्णता मिळते आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत मिळते.

– गुळात आढळणारे पोषक तत्त्व हे पचनासंबंधित समस्यांपासून वाचण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच साखरेने मधुमेह आणि अन्य आजाराला सामोरे जावे लागते. मात्र गुळात नैसर्गिक गोडाचे प्रमाण असल्यामुळे याचा शरीराला फायदा होतो. मात्र याचे अतिसेवनही करू नये.

– अन्नपचनासाठी नियमित गुळाचे पाणी प्यायल्यास फायदा होतो. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. याशिवाय गुळातील पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर पडतात. त्यामुळे अन्नपदार्थांमध्ये गुळाचा वापर केला जातो.

– गुळामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे गुळाचा वापर केल्यास मेटाबॉलिझम सुधारते. मेटाबॉलिझम चांगले राहिल तर वजन कमी करण्यास फायदा होतो. गुळाचे पाणी सकाळी प्यायल्यास जास्त फायदा होतो.

– गुळातून सोडियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात मिळतं त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी या उपायाचा फायदा होतो.

– गुळामध्ये लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे ज्यांचं हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं अशा लोकांसाठी त्यांचा फायदा होतो. अशक्तपणा कमी होतो.

गुळाचे पाणी कसे तयार कराल?

गुळाचे पाणी अर्थात Jaggery Water बनवण्याकरिता 10 ते 15 ग्रॅमचा एक तुकडा घ्या. हा गुळाचा तुकडा 1 ग्लास पाण्यात टाकून ठेवा. रात्रभर तुकडा पाण्यात भिजत ठेवा. म्हणजे तो पूर्णपणे पाण्यात विरघळेल. सकाळी जेव्हा गुळाचा तुकडा पाण्यात व्यवस्थित विरघळेला दिसेल, तेव्हा ते पाणी गाळून घ्या. आता हे गाळून घेतलेले गुळाचे पाणी तुम्ही सेवन करू शकता. हे पाणी गरम करूनही पिऊ शकता.

गुळाचे पाणी पिताना कोणती काळजी घ्याल ?

वजन कमी करण्यासाठी गुळाचे पाणी सेवन करताना लक्षात ठेवा की, गुळामध्ये अधिक प्रमाणात उष्णता असते. त्यामुळे गरोदर महिलांनी गुळाच्या पाण्याचे सेवन करू नये. स्तनपान करणाऱ्या महिलांना गुळाच्या पाण्याचे सेवन करू नये. कोणत्याही आजारामुळे औषधे घेत असाल तर गुळाच्या पाण्याच्या सेवन करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने गुळाच्या पाण्याचे सेवन करा.