शेंगदाणे खा…निरोगी राहा !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काजूपेक्षाही शेंगदाणे जास्त पौष्टिक असतात, आहारतज्ज्ञ सांगतात. उत्तम आरोग्यासाठी आहारात भाजलेल्या किंवा कच्च्या शेंगदाण्याचा वापर करावा. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्त्व डी भरपूर प्रमाणात असते. शेंगदाण्यात प्रथिनांचे प्रमाण मांसापेक्षा 1.3 पट, अंड्यांपेक्षा 2.5 पट आणि फळांपेक्षा 8 पट जास्त आहे. 100 ग्रॅम कच्च्या शेंगदाण्यात 1 लिटर दुधाएवढी प्रथिने असतात तसेच 250 ग्रॅम पीनट बटर, 300 ग्रॅम पनीर, 2 लिटर दूध किंवा 15 अंडी खाल्ल्याने जेवढी ऊर्जा शरीराला मिळते, तेवढी ऊर्जा शेंगदाणे खाल्ल्याने मिळू शकते. भाजलेले शेंगदाणे सर्वोत्तम की कच्चे शेंगदाणे, यावर नेहमीच चर्चा होते. या दोन्ही प्रकारच्या शेंगदाण्यांमध्ये कोणते पोषक घटक शरीरासाठी फायदेशीर आहेत, पाहूया !

सुकामेवा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात, मात्र आहारात शेंगदाण्याचा समावेश केला तर यातून ओमेगा 6 आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड शरीराला मिळते. हे गुणधर्म फारच कमी पदार्थांमध्ये आढळतात. शरीरासाठी हे दोन्ही पौष्टिक घटक अत्यंत आवश्यक आहेत. ज्यांना ह्रदयाशी संबंधित विकार आहेत त्यांच्याकरिता शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरते. शेंगदाण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. शेंगदाणे खाल्ल्याने रक्त वाढते. चण्यांच्या तुलनेत कॅलरी नियंत्रणात ठेवण्याकरिता शेंगदाणे जास्त फायदेशीर आहेत.

कच्चे शेंगदाणे

कच्च्या शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज, सॅच्युरेटेड फॅट, प्रथिने असतात. कच्चे शेंगदाणे कोलेस्ट्रॉल फ्री असतात. कमी कार्ब असल्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी आहारात शेंगदाण्याचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. शेंगदाण्यांमध्ये हाय फॅट कॅलरीज असतात, त्यामुळे इतर पदार्थांसोबत कमी प्रमाणात शेंगदाणे खाण्याचा सल्ला आहारातज्ज्ञ देतात. कच्चा शेंगदाणा खाल्ल्याने शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदे होतात. शेंगदाण्यापासून तयार केलेल्या पीनट बटरमध्ये पौष्टिक घटक असतात. विशेषत: हिवाळ्यात भाजलेले आणि खारे शेंगदाणे खाणे लोकं जास्त पसंत करतात.

भाजलेले शेंगदाणे

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तेलात परतवलेल्या शेंगदाण्यांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे ते ह्रदयविकार असलेल्यांसाठी गुणकारी आहेत. तेलात तळलेला शेंगदाणा खाल्ल्याने शरीरातील फॅटचे प्रमाण वाढत नाही. भाजलेले शेंगदाणे माफक प्रमाणात खावेत, ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास उच्च रक्तदाब आणि ह्रदयविकाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, यामुळे शरीरात होणारी जळजळ कमी व्हायला मदत होते तसेच पचनक्रिया सुरळीत राहण्याकरिताही भाजलेले शेंगदाणे खाणे गुणकारी आहे.