
झोप आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी तणावमुक्त जीवनशैलीकरिता अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सुंदर त्वचेपासून पचनसंस्था, मानसिक आरोग्य, रक्तदाब असे बरचसे आजार पुरेशी आणि गाढ झोप घेतल्याने दूर होतात. याकरिता शांत झोप घेणे आवश्यक आहे, मात्र अतिव्यस्त, तणावयुक्त आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे झोपेवर परिणाम होते. रात्री गाढ झोप न लागल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. दिवसभर उत्साहात काम करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी 7 ते 8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. झोप अपुरी झाल्यास त्याचा परिणाम कार्यक्षमतेवर आणि आरोग्यावर होतो. याकरिता जाणून घेऊया शरीरासंदर्भातील अशा गोष्टी, जी तुम्हाला झोपेची आवश्यकता आहे, हे सुचित करतात.
गजर वाजल्याशिवाय उठता न येणे
रात्रीच्या वेळी तुम्हाला गाढ आणि पुरेशी झोप लागली तर सकाळी उठण्याकरिता घड्याळाला गजर लावण्याची आवश्यकता लागत नाही, पण जर तुम्ही गजर झाल्यानंतर झोपून रहाता किंवा उठण्याची वेळ झाली तरीही शरीरात आळस जाणवत असेल तर तुम्हाला जास्त झोपेची गजर आहे, हे लक्षात घ्या.
वाहन चालवण्यास अडचण
वाहन चालवताना तुम्हाला झोप येत असेल, तर हीसुद्धा झोप पूर्ण न झाल्याची सूचना आहे. वाहन चालवताना झोप येणे हे धोकादायक आहे, यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. शिवाय बहुतांश वेळा झोपेचा अभाव हेच अपघाताचे कारण सांगितले जाते.
कॅफीनची आवश्यकता
दिवसाची सुरुवात एक कप चहा किंवा कॉफी घेऊन बरेच जण करतात, पण जर एखादे चांगले काम करण्यासाठी तुम्हाला एकापेक्षा जास्त वेळा कॉफी किंवा चहा घेण्याची आवश्यकता भासत असेल तर तुम्हाला रात्री पुरेशी झोप मिळालेली नाही, हे कारण असू शकते. याकरिता रात्रीच्या गाढ आणि निवांत झोप कशी लागेल याकडे लक्ष द्यावे.
एकाग्रतेचा अभाव
कामात लक्ष न लागणे, तुमच्याकडून सतत चुका होणे, एकाग्रतेचा अभाव हीसुद्धा झोप पूर्ण न होण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे ही कारणे एखादे काम करताना लक्षात येत असतील, तर झोप पूर्ण होत आहे की, याकडे लक्ष द्या.
विसरणे
सतत काही ना काहीतरी विसरत असाल. छोटी छोटी कामेही लक्षात राहात नसतील. दिससभरात विसरण्याचे प्रमाण वाढले आहे, हे तुमच्या लक्षात आले, तर अनिद्रेच्या समस्येने तुम्ही त्रस्त आहात, हे लक्षात घ्यावे.




























































