
>> संजीवनी धुरी-जाधव
बदलत्या वातावरणानुसार आपल्या त्वचेमध्येही अनेक बदल होत असतात. त्वचेवर होणाऱया बदलांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. पावसाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या ऋतूत सुंदर दिसण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.
त्वचा एक्सफोलिएट करणं आवश्यक
तज्ञांच्या माहितीनुसार, पावसाळ्यात त्वचेला एक्सपहलिएट करणं आवश्यक असते. यासाठी आठवडय़ातून 2-3 वेळा स्क्रब करणे योग्य असते. स्क्रब केल्याने रक्ताभिसरण वाढते. मृत पेशींचा थर काढून टाकला जातो, तेव्हा तुमची स्किनकेअर उत्पादने अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातील. घरच्या घरी स्क्रब करायचे असल्यास मध-साखर एकत्र करून स्क्रब करावे. साखर मृत त्वचेला काढून टाकण्यास मदत करते, तर मध त्वचा मॉईश्चराईझ करण्यास मदत करते.
सोप फ्री क्लिन्झर
सोप फ्री क्लिन्झर सौम्य असतात आणि त्वचेचे नैसर्गिक तेल काढून टाकत नाहीत, जे सर्व ऋतूंमध्ये आवश्यक असतात. तुमच्या त्वचेचा पोत कोणताही असला तरी पावसाळ्यात तुमची त्वचा कोरडी न करता तेलापासून मुक्त होण्यासाठी सोप फ्री फेसवॉशचा वापर करायला हवा. त्वचेची स्वच्छता राखण्यासाठी चेहरा धुणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र सतत चेहरा न धुता दिवसातून दोन ते तीनवेळा चेहरा धुवावा.
पायांची करा देखभाल
पावसाळ्यात बंद किंवा पावलाखाली, बोटांजवळ पाणी साचवून ठेवणारी सॅण्डल्स वापरू नयेत. पायांच्या बोटांमध्ये पाणी साठून तिथली त्वचा मऊसर होऊन चिखल्या होण्याची शक्यता असते. ऑफिसमध्ये गेल्यावर ते सॅण्डल काढून पाय कोरडे करावेत. पायांना जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी रात्री घरी आल्यावर कोमट पाण्यात पाय 10 मिनिटे बुडवून ठेवावेत.
लाईट मेकअप करावा
पावसाळी किंवा दमट हवामानात जास्त मेकअप न करता लाइट मेकअप करणे केव्हाही चांगले आहे. लाइट मेकअपसाठी बीबी क्रीम आणि थोडे कॉम्पॅक्टचा वापर करू शकता. पावसात दमटपणामुळे चेहऱयावर घाम येतो, तसेच मस्करा आणि आयलायनर पसरण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी चांगल्या दर्जाचा वॉटरप्रूफ मेकअप निवडावा, असे तज्ञांनी सांगितले.
क्लिन्झिंग करणे गरजेचे
पावसाळ्यात नियमित क्लिन्झिंग करणे गरजेचे आहे. क्लिन्झिंग सकाळी उठल्यावर, झोपण्यापूर्वी आणि मेकअप काढल्यावर करावे. यासाठी घरच्या घरी कच्चे दूध, बटाटय़ाचा रस, गुलाबजल यांपैकी काहीही वापरू शकता. तसेच मेकअप काढण्यासाठी नारळाचे किंवा बदामाचे तेल वापरू शकता. क्लिन्झिंग केल्यामुळे त्वचेवरील छिद्रे मोकळी आणि स्वच्छ होतात तसेच त्वचेवरील डेड स्किन निघून जाते.
क्ले मास्क वापरण्यापूर्वी
क्ले मास्कमुळे त्वचेतील धूळ आणि माती निघून जाण्यास मदत होते. आवडीनुसार क्ले मास्कची निवड करावी. चेहऱयावर आणि मानेवर हा मास्क लावून घ्यावा. मास्क लावण्यापूर्वी वापरदेखील करू शकता, ज्यामुळे तुमच्या चेहऱयावर मास्क उत्तम पद्धतीने लावता येईल.
सनस्क्रीनचा वापर करा
सूर्यप्रकाश असतानाच सनस्क्रीनचा वापर करावा असे नाही, तर पावसाळ्यातही सनस्क्रीनचा वापर करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात जेल बेस्ड सनस्क्रीनची निवड करावी. तज्ञांच्या मते, सनस्क्रीन प्रत्येक ऋतूमध्ये आवश्यक आहे. कारण सनस्क्रीन तुमच्या त्वचेला पावसाळ्यातही अनेक समस्यांपासून वाचवू शकते.
टोनरचा वापर करा
आपली त्वचा उजळ आणि स्वच्छ दिसण्यासाठी पावसाळ्यात टोनरचा वापर करणे योग्य मानले जाते. चेहऱयाला अतिरिक्त तेल सुटू नये तसेच त्वचा फ्रेश करण्यासाठी टोनर वापरावा. टोनरची निवड करताना ते अल्कोहोल फ्री असावे याची काळजी घ्यावी. नेहमी असा टोनर वापरा, ज्याने त्वचा कोरडी पडणार नाही.


























































