लाईटच्या खांबांचा करंट रोखण्यासाठी विद्युतरोधक रंग, दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेचा निर्णय

पावसाळ्यासह इतर दिवसात लाईटच्या खांबांना स्पर्श होऊन शॉक लागण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने ‘बेस्ट’च्या लाईटच्या खाबांना विद्युत रोधक रंग लावण्याचा निर्णय घेतला आहे.

जमिनीपासून 10 फूट उंचीपर्यंत हा विद्युतरोधक रंग लावण्यात येणार आहे. यामुळे दुर्घटना टळण्यास मोठी मदत होणार आहे. पावसाळ्यात विजेच्या खांबाच्या संपर्कात आल्याने शॉक लागण्याचा धोका टाळण्यासाठी खांब्याला अर्थिंग करण्यात येते. परंतु गर्दीच्या वेळी शॉक लागण्याची शक्यता अधिक असते.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी लोखंडी खांबांना लाकडी आवरण बसवण्याची मागणी ठरावाची सूचना मांडली होती. पालिका प्रशासनाने लाईटचे खांब बनवणाऱया कंपन्यांबरोबर चर्चा केली. यामध्ये खांबांना लाकडी आवरण बसवणे शक्य नसल्याचे स्पष्ट करताना खांबांना जमिनीपासून 10 फूट उंचीपर्यंत विद्युत रोधक रंग लावण्याचा पर्याय योग्य असल्याचे सांगण्यात आले.

यानुसार सध्या प्रायोगिक तत्त्वावर झोपडपट्टी व सार्वजनिक उद्यानातील विजेच्या खांबांना विद्युत रोधक रंग लावण्यात येणार आहे. त्यानंतर वीज रोधक रंगाचा किती उपयोग होईल, याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

अभ्यासात उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाल्यास तशा प्रकारचा रंग मुंबईतील सर्व विजेच्या खाबांना लावण्याबाबत विचार करता येईल असे पालिका आयुक्तांनी ठरावाच्या सूचनेवर अभिप्राय देताना स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या