
वाहन परवान्यांबाबत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आरटीओ कार्यालयांनी लॉकडाऊन काळात कमी केलेला शिकाऊ आणि पक्क्या लायसन्सचा कोटा पुर्ववत करावा. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील चाचण्या घेऊन वाहन परवान्याची वेटींग कमी करावी, अशा सूचना राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सर्व आरटीओ कार्यालयांना दिल्या आहेत.
लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने मार्चअखेरपासून राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे (आरटीओ) कामकाज बंद ठेवण्यात आले होते. या काळात आरटीओ कार्यालयांतून केवळ अत्यावश्यक वाहनांना वाहतूक परवानगी देण्याचे काम सुरु होते. लॉकडाऊनमध्ये जवळपास चार महिने आरटीओतील कामकाज होऊ शकले नाही. नियमांत शिथीलता दिल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये आरटीओतील कामकाज अंशतः सुरु झाले. सुरवातीला केवळ वाहन नोंदणीचे काम सुरु करण्यात आले. परंतु लायसन्स संबंधीत कामकाज होऊ न शकल्याने प्रलंबीत कामांची संख्या वाढली आहे. राज्यभरातील हजारो नागरिकांची कामे खोळंबली आहेत. ही बाब परिवहन आयुक्तांच्या निदर्शनास आली असून त्यांनी यावर पाऊले उचलली आहेत. यानूसार आरटीओ कार्यालयांनी त्याच्या कार्यालयातील कच्या आणि पक्क्या परवान्याचा कोटा लॉकडाऊन पुर्व कोट्याप्रमाणे पुर्ववत करण्याचे सांगितले आहे. याशिवाय सुट्टीच्या शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी वाहन चाचण्या करण्याचे सांगितले असून यावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रत्येक सोमवारी परिवहन आयुक्त कार्यालयांना पाठविण्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे आता प्रत्येक आरटीओ कार्यालयाला कोटा पुर्ववत करुन नागरिकांना वेळेत लायसन्स देण्यासाठी कार्यवाही करावी लागणार आहे.
…प्रत्येक सोमवारी अहवाल द्यावा लागणार
नागरिकांना वाहन परवान्याची अपॉइंटमेंट मिळण्यास लागणारा कालावधी कमी करण्यासाठी 31 ऑक्टोंबर पर्यंत कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले आहे. सुरू असलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रत्येक सोमवारी परिवहन आयुक्त कार्यालयात पाठविण्याचे आदेशात म्हटले आहे.
“लॉकडाऊनमध्ये आरटीओतील कामकाज बंद असल्याने काही भागात लायसन्ससाठीच्या अपॉइंटमेंट उशीरा मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. यानूसार कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना लवकरात लवकर लायसन्स मिळविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत.“– अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य

























































