
त्रास देत असल्याच्या कारणातून सराईत गुंडावर शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना काल रात्री आठच्या सुमारास लोहगावमधील विमानतळानजीक घडली. याप्रकरणी लेडी डॉनसह तीनजणांना पोलिसांनी अटक केले आहे.
सुमीत दिलीप जगताप (वय 34, रा. कालवड वस्ती, लोहगाव) हे खून करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध लोहगाव परिसरात मारामारी व सशस्त्र हल्ल्यांचे तीन गुन्हे दाखल आहेत. खुनप्रकरणी पोलिसांनी शबनम हनीफ शेख (वय 35, रा. भुकन वस्ती, लोहगाव), महंमद हुसेन महंमद शरीफ कुरेशी (वय 33) आणि सलीम मुर्तुजा शेख (वय 32, सर्व रा. लोहगाव) यांना अटक केली.
सुमीत जगताप सराईत गुंड होता. त्याचे लोहगाव परिसरातील लेडी डॉन नावाने परिचित असलेल्या शबनमसोबत जुने मैत्रीचे संबंध होते. परिसरातील अवैध व्यवसायात शबनमने जम बसविला होता. त्यातून दोघांमध्ये नेहमी वादावादी होत असे. गेल्या काही महिन्यापासून सुमीत शबनमला सातत्याने त्रास देत होता. त्यावरून शनिवारी (दि. 3) रात्री आठच्या सुमारास त्यांच्यात लोहगावमधील खेसे पार्क परिसरात जोरदार भांडणे झाली.
त्यानंतर शबनम व तिच्या साथीदारांनी सुमीतवर धारदार शस्त्रांचे वार करून आणि दांडक्यांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमीतला त्यांनी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
गुन्हे शाखेने केली तिघांना अटक
खूनाची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट चारचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. त्यावेळी लेडी डॉन शबनम शेख व तिच्या साथीदारांनी सुमीतवर हल्ला केल्याची माहिती पोलीस हवालदार गणेश साळुंखे आणि राकेश खुनवे यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने खडकीतील दूध योजना कार्यालयाच्या परिसरात छापा टाकून तिन्ही आरोपीना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. खुनाच्या घटनेनंतर लगेचच गुन्हे शाखेने आरोपीना तत्काळ अटक केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले. तिन्हीही आरोपींना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


























































