lok sabha 2019- बीडमध्ये अमरसिंह पंडितांच्या शिवतिर्थावर ‘हॉट ड्रामा’

45

उदय जोशी, बीड

बीड लोकसभेसाठी बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर शनिवारी बीडमध्ये एक हॉट ड्रामा पाहायला मिळाला. सोनवणे यांच्या नावाच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचा ताफा सुरेश धसांच्या आष्टीच्या बालेकिल्ल्याकडे रवाना होण्यापूर्वी बीडच्या अमरसिंह पंडित यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानावर थांबला होता. तेव्हा पंडितांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेची उमेदवारी न दिल्याने संताप व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या विरोधात घोषणाबाजीही झाली.

बीड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. अमरसिंह पंडित कामालाही लागले होते. यंत्रणा सुसज्ज ठेवली गेली होती. गावागावात निरोप पाठवण्यात आले होते. आणि अचानक शुक्रवारी मुंबईत बैठकीमध्ये अमरसिंह पंडित यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं. त्याचे पडसाद शुक्रवारी रात्रीपासूनच उमटायला सुरुवात झाली. अमरसिंह पंडित यांचे लहान बंधू विजयसिंह पंडित यांनी फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल करत ‘आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझवताना वाचवले असते‘ असं म्हटलं.

एवढेच काय आज सकाळी धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके यांच्यासह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा ताफा सुरेश धसांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच आष्टीकडे बैठकांसाठी रवाना झाला. तत्पूर्वी बीडच्या अमरसिंह पंडित यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी राष्ट्रवादीचे हे बडे नेते दाखल होताच हॉट ड्रामा पाहाण्यास मिळाला. अमरसिंह पंडितांना उमेदवारी देण्याचे टाळल्याने पंडित समर्थक संतापले आहेत. संतापाच्या भरात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाब विचारला. एवढेच काय राष्ट्रवादीच्या विरोधात घोषणाबाजीही केली. गेवराईत आज होणाऱ्या बैठकाही रद्द करण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या