जालन्याचा तिढा सुटला, युतीचा धर्म पाळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत युतीचा धर्म पाळण्याचे ठरले. त्यानंतर शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एकमेकांना पेढा भरवून युतीधर्म पाळणार असल्याचे जाहीर केले.

arjun-khotkar-danve

जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची इच्छा होती. मतदारसंघातील शिवसैनिकांनीही त्यासाठी आग्रह धरला होता. युती झाल्यानंतरही हा आग्रह कायम राहिल्याने तिढा निर्माण झाला होता. हा गुंता सोडवण्यासाठी मुंबईत मातोश्री निवासस्थानी बैठकही झाली. मात्र त्यातही तोडगा निघाला नव्हता.

संभाजीनगर येथे शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले. हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये रावसाहेब दानवे व अर्जुन खोतकर यांच्याशी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे यावेळी उपस्थित होते. या चर्चेत युतीचा धर्म पाळण्याचे ठरले. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांना पेढा भरवला. अर्जुन खोतकर यांनीही पक्षप्रमुखांनी सांगितलेला युतीचा धर्म पाळणार असल्याचे सांगत दानवे यांना पेढा भरवला.