महाराष्ट्र स्वाभिमानी! तो तुम्ही विकत घेऊ शकत नाही! आदित्य ठाकरे यांचा शिर्डीत मिंध्यांवर हल्ला

40 गद्दार सुरतला पळून गेले तेव्हापासून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवायला सुरुवात झाली. भाजपचे प्रत्येक पाऊल महाराष्ट्रविरोधी होते हे मिंध्यांना समजलेच नाही. आता त्यांना वाटेल 50 खोके देऊन खासदार, आमदार पळवले तसा महाराष्ट्रही जिंकता येईल. पण महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे, तो कुणालाही विकत घेता येणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे गट आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाक्चौरे यांनी नगर जिह्यातील राहाता प्रशासकीय कार्यालयात आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी आयोजित सभेमध्ये आदित्य ठाकरे बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान टिकवायचे असेल, महिलांचे आणि शेतकऱयांचे प्रश्न सोडवायचे असतील तर शिवसेनेच्या मशाल चिन्हाला मतदान करावे लागेल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मोदी सरकारच्या फसवणुकीच्या धोरणावर आदित्य ठाकरे यांनी यावेळी सडकून टीका केली. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वात आधी आपण शेतकऱयांचे कर्ज माफ केले, ही खरी ठाकरे गॅरंटी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. अवकाळीग्रस्त शेतकऱयांना महाविकास आघाडी सरकारने नुकसानभरपाई दिली, मात्र मोदी सरकारने दिल्लीत शेतकऱयांवर ड्रोनद्वारे अश्रुधूर सोडला, असे ते म्हणाले.

या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार शंकरराव गडाख, सुनील शिंदे, लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष संदीप वरपे आदी उपस्थित होते.

400 पारच्या पुढे आता तडीपारच लागणार

अबकी बार 400 पारचा नारा भाजपने दिला आहे, पण त्या 400 पारच्या पुढे यावेळी तडीपारच लागणार आहे, कारण देशात आता परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘साऊथ में साफ, नॉर्थ में हाफ’ अशी घोषणा कुणीतही दिली आहे ती वस्तुस्थिती आहे, असे ते म्हणाले.