Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 55 टक्के मतदान, देशात सरासरी 62 टक्के प्रतिसाद

जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशातील 19 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 54.85 टक्के तर देशात सरासरी 62.37 टक्के मतदान झाले. त्रिपुरात सर्वाधिक 80 टक्के तर बिहारमध्ये सर्वात कमी 46 टक्के मतदान झाले. दरम्यान, पश्चिम बंगाल आणि तणावग्रस्त मणिपूरमध्ये काही किरकोळ हिंसाचाराच्या घटना घडल्या तर छत्तीसगडमध्ये मतदान केंद्राजवळ झालेल्या ग्रेनेडच्या स्फोटात सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात मतदान झाले. बस्तरसह विविध नक्षलग्रस्त भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. या टप्प्यात 1.87 लाख मतदान केंद्रांवर 18 लाखांहून अधिक मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या मतदान केंद्रांवर 16.63 कोटींहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, मतदारांमध्ये 8.4 कोटी पुरुष, 8.23 कोटी महिला तर 11,371 तृतीयपंथीय यांचा समावेश होता. 20 ते 29 वयोगटातील 3.51 कोटी मतदार आहेत.

महाराष्ट्रात नक्षलग्रस्त भागात सर्वाधिक मतदान

गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी ही चार विधानसभा क्षेत्रे नक्षलग्रस्त आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने येथे सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत मतदान झाले. तर ब्रम्हपुरी आणि चिमूर या दोन विधानसभा क्षेत्रात सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडले.

अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनचा गोंधळ

तामीळनाडू, अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार बेटे आणि आसामच्या काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनमध्ये गोंधळ पहायला मिळाला. अनेकांनी ईव्हीएम मशीन योग्य प्रकारे काम करत नसल्याच्या तक्रारी केल्या. तर आसाम आणि तामीळनाडूमध्येही अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. लखीमपूरमध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाणारे वाहन नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बुडाले. त्यामुळे ईव्हीएम मशीन खराब झाल्या. दरम्यान, विविध मतदान केंद्रांवर नवविवाहीत जोडपी, दिव्यांग आणि स्ट्रेचर तसेच व्हीलचेअरवरून येऊन वयोवृद्ध मतदारांनीही मतदान केल्याचे दिसले.

छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानाचा मृत्यू

छत्तीसगडमधील विजापूर येथे उसूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील गलगाम येथे झालेल्या ग्रेनेड स्फोटात देवेंद्र कुमार या सीआरपीएफ-196 बटालियनच्या जवानाचा मृत्यू झाला. मतदान केंद्रापासून 500 मीटर अंतरावर हाताळणी करताना चुकून ग्रेनेडचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. तर वीजापूर जिह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी झाला.

कुचबिहारमध्ये सीआरपीएफ जवानाचा मृतदेह आढळला

बंगालमधील कूचबिहारमध्ये मतदान केंद्रावर सीआरपीएफ जवानाचा मृतदेह आढळला. निलेश कुमार असे या जवानाचे नाव आहे. त्यांच्या मित्रांना ते आजारी अवस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. तसेच मतदारांना धमकावण्याच्या 80 आणि हिंसाचाराच्या 39 तक्रारी दाखल झाल्या.

कुठे किती टक्के मतदान

त्रिपुरा 80
पश्चिम बंगाल 77.57
आसाम 70.77
मेघालय 73.69
पुद्दुचेरी 72.08
मणिपूर 67.46
अरुणाचल 65.79
छत्तीसगड 63.41
जम्मू कश्मीर 65.08
सिक्किम 67.95
तामिळनाडू 63.20
अंदमान निकोबार 56.87
महाराष्ट्र 55.85
उत्तर प्रदेश 57.54
उत्तराखंड 53.72
मिझोराम 56.68
नागालँड 50.41
राजस्थान 51.91
बिहार 46.32

मणिपूरमध्ये ईव्हीएम जाळले, गोळीबाराची घटना

मणिपूरमध्ये पूर्व इंफाळमधील मोइरांगकंपू येथे जाळपोळ झाल्याची घटना घडली. येथे हल्लेखोरांनी मशीन जाळले. तर विष्णूपूर जिह्यातील थामनपोकपी येथील मतदान केंद्रावर गोळीबार झाला. यात तिघे जखमी झाले. इंफाळ पूर्व जिह्यात ईव्हीएमची तोडफोड करण्यात आली. तसेच पोलिसांसमोरच मैतेई समाजाच्या लोकांनी मतदान केंद्र ताब्यात घेतल्याची घटना घडली. दरम्यान, इंफाळमध्ये मतदानापूर्वी महिलांनी हिंसाचारग्रस्त राज्यात शांततेत मतदान व्हावे यासाठी प्रार्थना केली.

भाजपशासित नागालॅण्डमध्ये सहा जिल्ह्यांत 0 टक्के मतदान

नागालँड या भाजपशासित राज्यात सहा जिह्यांमध्ये एकाही मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नाही. ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनने मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पूर्वेकडील जिह्यांसाठी केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करत बहिष्काराचे आवाहन करण्यात आले होते. नागालँडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील मित्रपक्ष आणि इंडिया आघाडी यांच्यात सरळ लढत आहे.

महाराष्ट्रातील मतदान (टक्क्यांमध्ये)

मतदार संघ 2019 2024
रामटेक 62.3 52.38
नागपूर 54.94 47.91
भंडारा-गोंदिया 68.81 56.87
गडचिरोली-चिमूर 72.33 64.95
चंद्रपूर 64.89 55.11