भाजप 200 पारही करू शकणार नाही! आता जुमल्याचे रूपांतर ‘गॅरंटी’त झालेय, आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

‘जुमल्या’च्या नावाखाली सत्तेत आलेल्या भाजपने शेतकरी, युवा, तरुण आणि महिलांसह सर्वच पातळय़ांवर जनतेची फसवणूक करीत आता ‘जुमल्या’चे रूपांतर केवळ ‘गॅरंटी’त केले आहे. मात्र जनतेने गेली दहा वर्षे भाजपची हुकूमशाही, अत्याचार पाहिला आहे. त्यामुळे यापुढे या ‘जुमलेबाज’ गॅरंटीला भुलणार नाही. चारशे पार सोडाच, भाजप 200 चा आकडाही पार करू शकणार नाही, असे आज शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.

महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे लोकसभेचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.  संपूर्ण देशात सध्या भाजपविरोधी वातावरण आहे. बिहारमध्ये नितीशकुमार भाजपसोबत गेले असले तरी तेजस्वी यादव 20 खासदारांसह दिल्लीत जातील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करून हुकूमशाहीचा दाखलाच दिला आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे. झारखंडमध्येही असाच प्रकार घडला. मात्र जनता आता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही  त्यांनी व्यक्त केला.  खोटं बोलून दोन वेळा सत्ता मिळवली, मात्र आता जनतेने भाजपचे कारस्थान ओळखले आहे. त्यामुळे भाजपला तडीपार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुन्हा सत्ता आली तर हे घरात घुसतील

-निर्मला सीतारामन यांनी सांगितलेले शेतकरी, महिला, युवा आणि गरीब या चार वर्गातील कुणीही खूश नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारने वादळ असो गारपीट असो प्रत्येक संकटात शेतकऱयाची साथ दिली, दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले. मात्र गेल्या अडीच वर्षांत मिंध्यांचा कृषिमंत्री शेतकऱयाला दिसलाही नाही. इथे उद्योग आणले तर नाहीच, मात्र इथले उद्योग गुजरातला पळवले. आता कुणी काय खातोय यावरून राजकारण सुरू केलेय. त्यामुळे यांचे सरकार पुन्हा आले तर हे तुमच्या घरात घुसतील. तुम्ही काय खावे काय खाऊ नये, हेदेखील ठरवतील. त्यामुळे भाजपला यावेळी तडीपार केलेच पाहिजे, असेही ते म्हणाले.