Lok Sabha Election 2024 : मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण यांची सभा उधळली

भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना जांब येथे मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण यांची सभा उधळून लावली.

‘आदर्श’फेम अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये उडी मारली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते. मात्र त्या वेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी काहीही केले नाही, याचा राग मराठा आंदोलकांना आहे. मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील यांनी कोणत्याही राजकारण्याला आपल्या दारात उभे करू नका, असे आवाहन केले आहे. त्याचा मोठा परिणाम नांदेड जिल्हय़ात पाहण्यास मिळत आहे. गावागावांत अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

प्रताप पाटील-चिखलीकरांच्या प्रचारासाठी जांब येथे आयोजित अशोक चव्हाण यांच्या सभेकडे गावाने पाठ फिरवली. काही मोजक्या लोकांसमोर अशोक चव्हाण भाषण करत असतानाच मराठा आंदोलकांनी त्यांना रोखले. चिखलीकरांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मराठा आंदोलकांचा रोष पाहून चव्हाणांना भाषणबाजी गुंडाळावी लागली.