रायगडात तटकरेंविरोधात तटकरे, 1991 पासून ‘सेम’ नावाच्या उमेदवारांची परंपरा

sunil-tatkare

मिंधे गट व भाजप नेत्यांच्या नाकदुऱ्या काढताना रायगड लोकसभेतील अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नाकीनऊ आले असतानाच आता त्यांच्यापुढे ‘स्वतःचे’च आव्हान उभे राहिले आहे. या मतदारसंघात सुनील तटकरे यांच्याविरोधात दुसऱ्या एका सुनील तटकरे नावाच्या उमेदवाराने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. नामसाधर्म्य असलेल्या या अपक्ष तटकरेंनी मते खाल्ल्यास सुनील तटकरे यांची डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान, 1991 पासून ‘सेम’ नावाच्या उमेदवारांचा हा सिलसिला सुरू आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात राजकीय रणधुमाळी जोरात सुरू आहे. लोकसभा मतदारसंघात 15 ते 19 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. नामनिर्देशनपत्र भरण्याच्या मुदतीत एकूण 30 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जाची छाननी 20 एप्रिल रोजी होणार असून, 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष यांच्यासह इतर पक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते व राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप, शिंदे गट महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान, अनंत गीते यांच्या नावाचे साधर्म्य असलेल्या अन्य दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला असतानाच आता तटकरे यांच्या नावाचे साधर्म्य असलेल्या एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.

मतांवर परिणाम

नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे प्रमुख उमेदवारांचे मोठे नुकसान झाल्याचे यापूर्वी समोर आले आहे. 1991 पासून नामसाधर्म्यामुळे दिग्गज उमेदवारांच्या मतांवर मोठा परिणाम झाला आहे. शेकापचे अॅड. दत्ता पाटील, काँग्रेसचे बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांना नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांचा सामना करावा लागला होता. यामुळे त्यांना मिळालेल्या मतांवर परिणाम झाला.