Lok Sabha Election 2024 : लोकहो, पाकीटमार शोधा! शरद पवार यांचे आवाहन

केंद्रात सत्तेवर आल्यानंतर शेतकरी पिकवतात ते स्वस्त करायचे आणि दुसरे पिकवतात ते महाग करायचे असे धोरण भारतीय जनता पक्षाने राबवले. भाजपच्या राजवटीत शेतकऱयांच्या एका खिशात पैसे टाकून दुसऱया खिशातून दुप्पट पैसे काढून घेतले जात आहेत. ही एकप्रकारची पाकीटमारी असून ती बंद झालीच पाहिजे, असा घणाघाती हल्ला करतानाच, लोकहो, या पाकीटमारांचा शोध घ्या आणि त्यांना बाजूला करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.

बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले होते की, पेट्रोलचे भाव 50 दिवसांत खाली आणतो. पण भाव दीडपट वाढले. तुम्ही जे पिकवता ते स्वस्त केले आणि दुसरे पिकवतात त्यासाठी तुमच्या खिशातून पैसे काढले काढले. ही पाकीटमारी बंद करायची असेल तर हा पाकीटमार कोण? याचा शोध घ्या आणि त्यांना बाजूला करा, असा घणाघाती हल्ला शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर चढवला.

देणे घेणे करून मत मागण्याची आमची भूमिका नाही

काल कुणीतरी बटन कसं दाबायचे हे सांगितले. मात्र, मी तसे सांगणार नाही. त्यांनी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, असे देखील म्हटले आहे. मात्र, देणे घेणे करून मत मागण्याची आमची भूमिका नाही. लोकांमध्ये काम करायचे, लोकांना शक्ती द्यायची, लोकांची सेवा करायची आणि मते मागायची ही आमची भूमिका आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

एका खिशात घालायचे आणि दुसऱया खिशातून काढून घ्यायचे ही स्थिती सध्याच्या सरकारची आहे.

अमित शहा नावाचे गृहस्थ गेल्या दहा वर्षांत शरद पवार यांनी काय केले याचा हिशेब मागतात. गेल्या दहा वर्षांत सत्ता कोणाची आहे? मंत्री कोण आहे? मी सत्तेत नव्हतो, पण हिशेब मात्र माझ्याकडे मागतात. सत्ता यांच्याकडे आहे याची त्यांना आठवण नाही!

भाजपला खडे बोल

मोदी-फडणवीस यांच्यासह अन्य नेते आमच्या विरोधात घटना बदलण्याचा खोटा प्रचार सुरू असल्याचे सांगतात. मात्र त्यांचेच केंद्र सरकारमधील हेगडे नावाचे एक मंत्री या देशाची घटना मोदींना बदलायची आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून द्या, असे सांगतात. घटना बदलण्याचा विचार गंभीर आहे.