Lok Sabha Election 2024 : भाजपला रोखण्यासाठी सोलापुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची माघार

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या  शेवटच्या दिवशी आज सोलापुरात नाटय़मय घडामोडी घडल्या. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. संविधानाला विरोध करणाऱया भाजपचा उमेदवार संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी अर्ज मागे घेतल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल गायकवाड (रा. बादोला, ता. अक्कलकोट) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. शक्तिप्रदर्शन करीत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज वैधही ठरला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून वंचित बहुजन आघाडीत नाटय़मय घडामोडी घडत होत्या. या पार्श्वभूमीवर राहुल गायकवाड यांनी आज आपल्या समर्थकांसह येऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. ही बातमी बाहेर येताच ‘वंचित’च्या गटात खळबळ उडाली. उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर राहुल गायकवाड म्हणाले, ‘माझी उमेदवारी ठेवणे म्हणजे भाजपच्या विजयासाठी मार्ग दाखवून देण्यासारखे होते. संविधानाला विरोध करणाऱया भाजपचा उमेदवार संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी अर्ज मागे घेतला आहे,’ असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राहुल गायकवाड जिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयात आले असता, त्यांना रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मडीखांबे हे कार्यालयात घुसले. त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राहुल गायकवाड बाहेर पडल्यानंतरच मडीखांबे यांना सोडण्यात आले. या नाटय़मय घडामोडींमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.

काहीजण ब्रोकरची भूमिका बजावत आहेत!

राहुल गायकवाड म्हणाले, ‘येथील वंचित बहुजन आघाडीतील कार्यकारिणीतील काही सदस्य ‘ब्रोकर’ची भूमिका बजावीत असल्याचे दिसून आले. माझ्या हातात बंदूक दिली आहे; पण त्यात गोळ्या नाहीत. त्यामुळे मी हे युद्ध जिंकू शकत नसल्याचे चित्र दिसत होते. मी जर अर्धवट लढलो, तर भाजपच्या उमेदवाराला मार्ग मोकळी करतोय, ही काळजी आहे. मी भाजपच्या विजयाला कारण ठरू नये, म्हणून माघार घेतली. संसदेत आणखी एक भाजपचा माणूस पाठवू नये, की ज्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला धोका होईल, म्हणून माघार घेत आहे,’ असे गायकवाड यांनी सांगितले. ‘सध्या वंचित बहुजन आघाडीत स्वार्थी लोक व ब्रोकर दिसत असल्याने ही लढाई लढू शकत नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.