मतदान करून देशाचे स्वातंत्र्य टिकवा! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवून दिलेय…

भाजपला चारशेपारचा आकडा देशाच्या कल्याणासाठी नको, तर पाशवी बहुमताच्या जोरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलून हुकूमशाही आणण्यासाठीच हवा आहे. चारशेपार मिळाले तर हे धुडगूस घालून जुलूम करतील. रशियाप्रमाणे जो विरोध करतो तो नाहीसा होतो, अशी भयंकर स्थिती निर्माण होईल. तेव्हा न्याय कुणाकडे मागणार? त्यामुळे ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवून दिले ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मतदान करा. हुकूमशाहीचा उदय होण्याआधीच अस्त करा, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

जनसंवाद यात्रेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज दक्षिण मुंबईतील भायखळा आणि डोंगरी येथे शाखांना भेटी देत संवाद साधला. भाजपच्या चारशेपारच्या नाऱयाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपने अलीकडेच विरोधी पक्षाच्या 146 खासदारांना निलंबित करून बहुमताच्या जोरावर घातक कायदे मंजूर करून घेतले. अशा हुकूमशाहीसाठीच त्यांना चारशेपार पाहिजे आहेत. त्यामुळे चारशेपारच का? सर्व 546 ही तुम्ही घेऊन टाका, असा टोलाही त्यांनी लगावला. संसदेतील बहुमताच्या जोरावर भाजपने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदलून दिल्ली सरकारचा निर्णय बदलला. अशा प्रकारे यांना पाशवी बहुमत मिळाले तर हे घटनासुद्धा बदलतील. रशियात सध्या पुतीन यांची हुकूमशाही सुरू आहे. त्यांना जो विरोध करतो तो नाहीसा होतो. न्यायमूर्तींच्या नेमणुकाही पुतीनच करतात, अशी माहिती आहे. ही स्थिती आपल्याकडे निर्माण झाली तर न्याय मागणार तरी कुणाकडे? या हुकूमशाही वृत्तीविरोधात मी तुमच्यासाठी उभा आहे. त्यामुळे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मतदान करून देशाला हुकूमशाहीपासून वाचवा, असेही ते म्हणाले. दक्षिण मुंबईत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून अरविंद सावंत यांना बहुमताने खासदार म्हणून निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, संतोष शिंदे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू सकपाळ, लोकसभा समन्वयक सुधीर साळवी, माजी महापौर श्रद्धा जाधव, उपनेते अरुण दुधवडकर, राजकुमार बाफना, मनोज जामसुतकर, अशोक धात्रक, माजी नगरसेवक रमाकांत रहाटे, युगंधरा साळेकर, राजू फोंडकर, सुनील कदम, दिलीप सावंत, अजय शेडगे, विनोद झुंजारे, राम सावंत, विजय कामतेकर, प्रमोद गावकर, मंगेश बनसोड यांच्यासह डोंगरी, भायखळा विभागातील शिवसैनिक उपस्थित होते.

हुकूमशाहीला पर्याय लोकशाहीचा!

भाजपला 2014 मध्ये सरकार घडवण्यासाठी आपल्या सहीची गरज होती. 2019 मध्येही अमित शहा ‘मातोश्री’वर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला लोटांगण घालायला आले होते. तेव्हा त्यांना घराणेशाही आठवली नाही. मात्र 30 वर्षांनी एकाच पक्षाचे सरकार आल्याचा आपल्यालाही अभिमान वाटला, मात्र 2019 ला अमित शहा यांनी दगाबाजी केली. आता मात्र हरलो तरी चालेल, मात्र घराणेशाहीचा पाठिंबा नको, असे सांगितले जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. सध्या ‘इंडिया’ आघाडीकडे मोदींसाठी पर्याय काय, असा सवाल उपस्थित केला जातोय, मात्र सध्या हुकूमशाहीला लोकशाही हाच पर्याय असल्याचे ते म्हणाले. आम्ही पर्याय व्यक्तीला नाही तर हुकूमशाही वृत्तीला देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वॉशिंग पावडरलाही लाज वाटेल

भाजप म्हणजे सध्या भ्रष्टाचार अभय योजना पक्ष झाला आहे. जितका घोटाळा म्हणजे तितके मोठे पद भाजपमध्ये मिळते. हीच का मोदी गॅरंटी का, असा सवालही त्यांनी केला. 70 हजार कोटींचा घोटाळा करणाऱयाला बाजूला बसवून उपमुख्यमंत्री केले. तर मुख्यमंत्री पद मिळालेल्याने किती कोटींचा भ्रष्टाचार केला असेल, असा सवालही त्यांनी केला. आता वॉशिंग पावडरलाही लाज वाटेल, अशी स्थिती असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेना कुणाची हे जाहीर सभेत सांगा!

भाजप, मिंध्यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या असतात. बिर्याणी खायला घालून भाषणे ऐकवली जातात. विशेष म्हणजे सभेला न येणाऱया बचतगटांनाही 50 रुपये दंड केला जातो, अशी भंडापह्डही उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनेच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी पाहून या पेटलेल्या मशाली हुकूमशाही जाळून टाकतील. सध्या लबाड लवाद नार्वेकर दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी फिरतोय, मात्र हिंमत असेल तर या लबाडाने एकही पोलीस न घेता जाहीर सभेत शिवसेना कुणाची आहे, हे सांगावे. मीदेखील एकही पोलीस न घेता येईन, असे आव्हानही त्यांनी दिले.

निवडणूक रोखे देणाऱयांना सरकारी कामे

सर्वोच्च न्यायालयाने भाजपचे निवडणूक रोख्यांचे भांडे पह्डले. निवडणूक रोख्यावरून सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या टाळक्यात सोटे हाणले आहेत. मुदत मागणाऱया एसबीआयने ताबडतोब निवडणूक रोख्यांची माहिती दिली. म्हणजे भाजपला मिळालेल्या रोख्यांची माहिती लपवायची होती का, असा सवालही त्यांनी केला. आता 22 हजार कोटींची माहिती दिली आहे, मात्र अजूनही तीन सवातीन हजार कोटींच्या रोख्यांची माहिती गुलदस्त्यात आहे. ही सर्व माहिती बाहेर येऊ दे. ज्यांनी रोखे दिले नाहीत अशांच्या मागे ईडी चौकशी लावली. यानंतर त्यांनी रोखे दिल्यानंतर आता त्या ईडी चौकशीचे काय झाले? रोखे दिल्यानंतर कुणकुणाला सरकारी कामे दिली ते जाहीर करा, असे आव्हानच त्यांनी दिले.

आता सरकारी यंत्रणा ‘भाई’ झालीय!

एक जमाना असा होता की मारुती 100 घेतली की खंडणीसाठी पह्न यायचा. तसे हे आता सरकारी यंत्रणा यांचे भाई झाले आहेत. हे पंपन्यांवर धाडी टाकतात नंतर त्यांच्या चौकशा करतात. सेटलमेंट झाली की सर्व शांत. चौकशा बंद. राहुल गांधी बोलले की सरकारी यंत्रणांचा वापर करून खंडण्या उकळल्या जात आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजप, मिंध्यांना आता सुट्टीवर पाठवायची वेळ!

मुंबईत 20 मे रोजी मतदान आहे. खूप वेळ आहे. पण गाफील राहू नका. परीक्षा संपल्या की मुंबईकर चाकरमानी कोकणात जातील. मात्र 20 तारीखला यांचे 12 वाजवण्यासाठी मला तुम्ही मुंबईत हवे आहात. यांना आता सुट्टीवर पाठवायचे दिवस आले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तेव्हा जाहिरातीत कोरोनाचे चित्र असायचे, आता दाढीवाल्याचे असते

महाराष्ट्रात यांच्या प्रचंड प्रमाणात जाहिराती सुरू आहेत. मी मुख्यमंत्री असताना जाहिराती असायच्या त्यावर कोरोना व्हायरसचं चित्र असायचं. आता दाढीवाल्याचं चित्र असतं. ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पेटलेले वातावरण शांत करण्यासाठी निवडणुकीचा कालावधी लांबवला

महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील मतदान महिनाभर चालणार आहे. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला फटकारले आहे. ‘सध्या भाजप आणि मिंधे सरकारविरोधात पेटलेले वातावरण शांत करण्यासाठी महाराष्ट्रातील निवडणुकीचा कालावधी लांबवला असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी डोंगरी येथील शाखा भेटीदरम्यान केला.