बांगलादेशकडून दक्षिण आफ्रिकेला धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वन डे वर्ल्ड कपमधला पहिलाच धक्कादायक निकाल सोमवारी लागला. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेवर 21 धावांनी शानदार विजय मिळवून गुणांची बोहणी केली. ‘आयसीसी’च्या स्पर्धांच्या जेतेपदापासून सातत्याने दूर राहणारा, दबावाखाली गळपटणारा, ‘चोकर्स’ म्हणून ओळखला जाणारा, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कोणाच्याही खिजगणतीत नसलेला अन् सलामीच्या लढतीत सपाटून मार खाणारा… ही स्टोरी दक्षिण आफ्रिकेची. त्यामुळे तसे बघायला गेले तर बांगलादेशचा हा विजय देदीप्यमान म्हणता येणार नाही. पण कागदावर दक्षिण आफ्रिका वरचढ असल्यामुळे त्यांना सलग दुसऱया पराभवानंतर ‘440 व्होल्ट’चा झटका बसला असेल यात शंका नाही.

सावध सुरुवात
बांगलादेशकडून मिळालेल्या 331 धावांचा पाठलाग करणाऱया दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली. क्विंटॉन डिकॉक व एडन मार्करम या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी रचली. दोघांची जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच मुशफिकर रहिमकडून क्विंटॉन डिकॉक धावचित झाला. त्याने 23 धावा तडकावल्या.

विंडीजमधील लढतीची झाली आठवण
बांगलादेशने या आधी वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला 2007 सालामध्ये हरवले होते. वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला 67 धावांनी धूळ चारली होती. आता तब्बल 12 वर्षांनंतर बांगलादेशला वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करता आले आहे.

धावफलक
बांगलादेश -तमिम इक्बाल झे. डिकॉक गो. फेहलुक्वायो 16, सौम्या सरकार झे. डिकॉक गो. मॉरिस 42, शाकिब अल हसन त्रि. गो. ताहिर 75, मुशफिकर रहिम झे. वॅन डेर दुसेन गो. फेहलुक्वायो 78, मोहम्मद मिथुन त्रि. गो. ताहिर 21, महमुदुल्लाह नाबाद 46, मोसाद्देक हुसेन झे. फेहलुक्वायो गो. मॉरिस 26, मेहिदी हसन नाबाद 5. अवांतर – 21, एकूण – 6 बाद 330 धावा. बाद क्रम- 1-60, 2-75, 3-217, 4-242, 5-250, 6-316. गोलंदाजी – लुंगी नगिडी 4-0-34-0, कॅगिसो रबाडा 10-0-57-0, ऍण्डील फेहलुक्वायो 10-1-52-2, ख्रिस मॉरिस 10-0-73-2, इम्रान ताहिर 10-0-57-2.

दक्षिण आफ्रिका – क्विंटॉन डिकॉक धावचीत 23, मार्करम त्रि.गो. शाकिब 45, डय़ुप्लेसिस त्रि.गो. मेहिदी 62, मिलर झे. मेहिदी गो. मुस्तफिजुर 38, वॅन दुसेन त्रि.गो. सैफुद्दीन 41, डय़ुमिनी त्रि.गो. मुस्तफिजुर 45 अवांतर -14 एकूण – 8 बाद 309 गोलंदाजी – मुस्तफिजुर 10-0-67-3, सैफुद्दीन 8-1-57-2.

शाकिब-मुशफिकर यांची झुंजार अर्धशतके
सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर शाकिब अल हसन (75) व मुशफिकर रहिम (78) यांनी झुंजार अर्धशतके झळकावत दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी निप्रभ ठरवली. या दोघांनी तिसऱया गडय़ासाठी 142 धावांची भागीदारी करीत बांगलादेशच्या डावाला खऱया अर्थाने आकार दिला. शाकिबने 84 चेंडूंत एका षटकारासह 8 चेंडू सीमापार पाठविले, तर मुशफिकरने 80 चेंडूंत 8 चौकार लगावले. इम्रान ताहिरने शाकिबचा त्रिफळा उडवून ही डोकेदुखी ठरू पाहणारी भागीदारी संपुष्टात आणली. त्याच्या जागेवर आलेल्या मोहम्मद मिथुनने 21 धावांची खेळी केली. इम्रान ताहिरने त्याचे दांडके उडविले. थोडय़ा वेळाने फेहलुक्वायो याने मुशफिकरलाही वॅन डेर दुसेनकरवी झेलबाद करून बांगलादेशला पाचवा धक्का दिला.

मॅन ऑफ दि मॅच
शाकिब अल हसन, बांगलादेश
दक्षिण आफ्रिकेच्या स्टार फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. एडन मार्करम (45 धावा), कर्णधार फाफ डय़ुप्लेसिस (62 धावा), डेव्हिड मिलर (38 धावा), जेपी डय़ुमिनी (45 धावा), वॅन दुसेन (41 धावा) आणि ऍण्डील फेहलुक्वायो (8 धावा) यांच्याकडून निराशा झाली.