केदार जाधव फिट, सलामीच्या लढतीत खेळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। साऊदम्पटन

एकीकडे अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून माघार घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा पाय खोलात गेला असतानाच टीम इंडियासाठी आनंदाची बातमी पुढे आली आहे. आयपीएलच्या लढतीदरम्यान जखमी झालेला महाराष्ट्राचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव हा पूर्णपणे फिट झाल्याचे उद्गार हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहली याने काढले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीआधी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, केदार जाधव सलामीच्या लढतीसाठी सज्ज झाला आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने विराट कोहली हा अपरिपक्व कर्णधार असल्याचे सांगत वाप्युद्धाला तोंड फोडले होते. यावर विराट कोहलीला विचारले असता तो म्हणाला, कॅगिसो रबाडाविरुद्ध अनेकदा खेळलो आहे. तो एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. तो भरात असेल त्या दिवशी प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज बाद करू शकतो. पण अशा प्रकारच्या प्रश्नांना पत्रकार परिषदेत उत्तर दयायला आवडत नाही.