कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कायम- सर्व्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लंडन

भले क्रिकेट जगतात टी-20 आणि वन डे क्रिकेट कितीही लोकप्रिय झाले असले तरी परंपरागत कसोटी क्रिकेटची गोडी आजही जगातील क्रिकेटशौकिनांत कायम असल्याचे लंडनच्या मेरिलबोर्न क्रिकेट क्लबने ( एमसीसी ) घेतलेल्या जागतिक सर्वेक्षणात उघड झाले आहे. 100 देशांच्या 13 हजार क्रिकेट शौकिनांच्या मते कसोटी क्रिकेटची लोकप्रियता आजही शिखरावरच आहे. कारण या परंपरागत फॉरमॅटमध्येच खेळाडूंना आपले कौशल्य, एकाग्रता आणि जिद्द यांचे पुरेपूर प्रदर्शन करता येते असे या क्रिकेटशौकिनांचे ठाम मत आहे.

232 वर्षे जुनी एमसीसी ही ज्येष्ठ क्रिकेट संघटना आजही क्रिकेटच्या नियमांत कालानुरूप आवश्यक सुधारणा करते आणि जागतिक क्रिकेटचे नेतृत्व करणारी आयसीसी ते नियम मानते हा प्रघात आहे. त्यामुळे एमसीसीचे नवे सर्वेक्षण कसोटी क्रिकेटसाठी नवसंजीवनी देणारेच ठरणार आहेत. एमसीसीच्या जागतिक क्रिकेट समितीचे अध्यक्ष माईक गॅटिंग म्हणतात की, अन्य देशांप्रमाणे आता कसोटी खेळणाऱया आशियाई देशांतही दिवस-रात्र कसोटी लढती खेळवण्याची जोरदार मागणी होत आहे. याचाच अर्थ कसोटी क्रिकेटची लोकप्रियता आजही शाबूत आहे.

ज्येष्ठ स्टार खेळाडूही एमसीसीच्या सर्व्हेशी सहमत

एमसीसीने कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कायम असल्याचे सर्व्हेद्वारे सांगितले आहे. या मताशी श्रीलंकेचा माजी स्टार फलंदाज आणि यष्टिरक्षक कुमार संगक्कारा याने पूर्ण सहमती दर्शवली आहे. संगक्कारासह एमसीसी क्रिकेट समितीत माजी कसोटीपटू सौरभ गांगुली, रिकी पाँटिंग आणि ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न यांचाही समावेश आहे.

लोकप्रियता राखण्यासाठी एमसीसीचे उपाय

कसोटी लढतीच्या तिकिटांचे दर सर्वसामान्य क्रिकेटशौकिनांना परवडतील असे कमी करणे. कसोटीच्या मोफत टीव्ही प्रसारणाची व्याप्ती वाढवणे. कसोटी लढतीसाठी अर्ध्या दिवसासाठी तिकीट देण्याचीही पद्धत सुरू करावी.