
व्हेज असो किंवा नॉनव्हेज, ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर दोन्ही पदार्थ आवडीने खातात. स्ट्रीट फूड म्हणजे त्यांचा जीव की प्राण! रेस्टॉरंटपेक्षा स्ट्रीट फूड लई भारी असे ते सांगतात. बहुतेक कलाकार डाएट फॉलो करतात, पण त्यांचे तसे नाही. प्रत्येक पदार्थ हा प्रमाणात खायचा, अवेळी जेवायचे नाही हाच त्यांचा फिटनेस फंडा आहे.
रंगभूमी, चित्रपट, मालिका असो किंवा हल्लीच्या वेब सीरिज… ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांनी या सर्वच माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनय क्षेत्रात करीअर करायचं म्हटलं तर शारीरिक आणि मानसिक फिटनेस खूप महत्त्वाचा असतो हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे कॉलेजात असल्यापासून उदय टिकेकर हे नियमितपणे स्विमिंग करायचे. पुढे अभिनय क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी व्यायामाची सवय लावून घेतली. आजही ते न चुकता व्यायाम करतात.
आमच्या क्षेत्रात रुटिन असे काहीच नसते, भूमिकेच्या निमित्ताने कलाकाराला दररोज काहीतरी नवीन सादर करायचे असते. त्यासाठी फिट राहणे खूप गरजेचं आहे असे ते सांगतात. उदय टिकेकर हे उत्तम खवय्येदेखील आहेत. त्यांची आई अप्रतिम जेवण बनवायची. आईने बनवलेल्या बासुंदी, गुलाबजाम, रबडी या पदार्थांची बात काही औरच… आमच्या घरी नॉनव्हेज बनवत नसल्यामुळे आई-बाबा नॉनव्हेज खाण्यासाठी मला बाहेर न्यायचे. पुढे आईने काकूकडून नॉनव्हेज कसे बनवायचे ते शिकून घेतले. तिने बनवलेल्या पालक चिकनची चव आजही जिभेवर रेंगाळतेय अशी आठवण त्यांनी सांगितली.
व्हेज असो किंवा नॉनव्हेज, दोन्ही पदार्थ ते अत्यंत आवडीने खातात. रेस्टॉरंटपेक्षा स्ट्रीट फूड लई भारी असल्याचे ते सांगतात. बहुतेक कलाकार डाएट फॉलो करतात, पण ते विशिष्ट डाएट करत नाहीत. कोणताही पदार्थ प्रमाणात खायचा, अवेळी जेवायचे नाही हाच त्यांचा फंडा आहे.
हवं ते खा, पण…
हल्ली फास्ट फूडचे प्रमाण वाढलेय, परंतु घरचे जेवण हे सर्वात उत्तम आहे. सगळी मेहनत ही आपण पोटापाण्यासाठी करतो. त्यामुळे जे हवे असेल ते खा, पण प्रमाणात. खास करून चाळिशीनंतर आरोग्याची विशेष काळजी घ्या. खाण्यापिण्याच्या सवयी बदला, असा सल्ला त्यांनी तरुणाईला दिला आहे. ‘जस्ट लिस्टन टू युअर स्टोमक अँड यू विल लिव्ह अ हेल्दी लाइफ’ असे ते सांगतात.
- मृदा झरेकर, म. ल. डहाणूकर कॉलेज


























































