
देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून आता स्वयंपाकघरातील बजेट आणखी कोलमडणार आहे. दूध, पेट्रोल-डीझेल आणि सीएनजीच्या दरवाढीनंतर आता गॅस कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरातही वाढ केली आहे. एलपीजीच्या दरात 29 रुपयांनी वाढ झाली असून गेल्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा ही वाढ करण्यात आली आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन दरवाढीमुळे मुंबईतील 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती सिलिंडरची किंमत 912 रुपयांवरून आता 941.50 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी 7 मार्चला घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली होती. यासोबतच लहान 5 किलोग्रॅमच्या सिलिंडरचा दर 339 रुपये झाला आहे, तर 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत 3,113 रुपये 50 पैशांवर स्थिर ठेवण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेल व दैनंदिन वापरातील अन्य वस्तूंच्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत असलाना आता पुन्हा LPG गॅसच्या दरवाढीमुळे त्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडणार आहे.
Domestic cooking gas LPG price hiked by Rs 29 per 14.2-kg cylinder: Sources
— Press Trust of India (@PTI_News) June 6, 2026
nbsp;
जागतिक स्तरावर 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या आखाती देशातील युद्धामुळे पुरवठ्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या किमतींमुळे घरगुती गॅस सिलिंडरही महागणार असे तर्क आधीपासूनच लावले जात होते, तरीही इतके दिवस हे दर वाढवण्यात आले नव्हते. यापूर्वी सरकारने 1 मे रोजी कमर्शियल सिलिंडरच्या दरात 993 रुपये आणि 5 किलोच्या सिलिंडरमध्ये 261 रुपयांची मोठी वाढ केली होती. यानंतर 1 जून रोजी कमर्शियल सिलिंडर पुन्हा 42 रुपयांनी महागला होता.
या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. देशात एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून कोणत्याही किरकोळ गॅस एजन्सीकडे गॅस संपलेला नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात सातत्याने कडक कारवाई केली जात आहे. होर्मुझ संकट असूनही देशात पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीचा पुरवठा विनाअडथळा सुरू राहण्यासाठी सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे.




























































