
पश्चिम द्रुतगती महामार्ग गोरेगाव पूर्व ते रिलीफ रोड आणि अंधेरी पश्चिमकडे जाणाऱया जोडरस्त्यांना थेट जोडणाऱया गोरेगावच्या नव्या विस्तारित मृणालताई गोरे उड्डाणपूल आजपासून मुंबईकरांच्या सेवेत आला आहे. यामुळे पाऊण तासाचा प्रवास अवघ्या दहा मिनिटांत होणार आहे.
मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारकामात वालभट नदीवरील विद्यमान पुलाचे पाडकाम करून पुनर्बांधणी करण्यात आली आहे. तसेच विद्यमान मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाचे विस्तारकामाशी एकत्रीकरण, अंदाजे 450 मीटर लांबीच्या पोहोच मार्गाचे सुधारीकरणदेखील करण्यात आले आहे. विस्तारित पुलाची एकूण लांबी 750 मीटर असून रुंदी 15.50 मीटर अशी आहे. या विस्तारामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग गोरेगाव पूर्व ते रिलीफ रोड तसेच अंधेरी,पश्चिमकडे जाणाऱया जोड रस्त्याला थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. या पुलामुळे स्वामी विवेकानंद मार्ग व परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. गोरेगाव (पश्चिम) येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यान मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार करण्यात आला आहे. या विस्तारीत टप्प्याचे लोकार्पण महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी या लोकार्पण सोहळ्यास आमदार विद्या ठाकूर, स्थानिक आमदार हारून खान उपस्थित होते. विस्तारित पुलामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार असून दहिसर, लोखंडवाला, जोगेश्वरी परिसरात जाणाऱया प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार असून जंक्शनवरील वाहतूक कोंडी फुटणार असल्याचे यावेळी शिवसेना आमदार हारून खान म्हणाले. यावेळी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, उप आयुक्त गिरीश निकम, भाग्यश्री कापसे, सहाय्यक आयुक्त अनिरुद्ध कुलकर्णी, चक्रपाणी अल्ले, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.


























































