
‘भारतीय अन्न महामंडळाने धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणलेल्या 20 हजार कोटींच्या प्रकल्पाचे बहुतेक काम अदानीच्या कंपनीला मिळाले आहे. त्यासाठी मूळ निविदेतून अँटी मोनोपॉली क्लॉज हटवण्यात आला. अदानीला मागच्या दरवाजाने शेती उद्योगात घुसवण्याचा सरकारचा हा डाव आहे,’ असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक व्हिडीओ शेअर करत हा गौप्यस्फोट केला आहे. त्यानुसार, भारतीय अन्न महामंडळाने धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी 20 हजार कोटींचा ‘हब अँड स्पोक’ प्रकल्प आणला आहे. याअंतर्गत धान्याची कोठारे (सायलो) बनवली जाणार आहेत. या कोठारांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. कोणत्याही कंपनीची मत्तेदारी राहू नये म्हणून निविदेत ‘अँटी मोनोपॉली क्लॉज’ टाकण्यात आला होता. जास्तीत जास्त कंपन्यांना हे काम देण्याचा प्रयत्न होता. मात्र, नीती आयोग आणि अर्थ मंत्रालयाच्या सल्ल्याने हा क्लॉज गुपचूप काढून टाकण्यात आला, असे श्रीनेत यांनी सांगितले.
एकटय़ा अदानींना 9,700 कोटींचे काम
मोनोपॉलीशी संबंधित क्लॉज हटवल्यानंतर 134 कोठारांपैकी 110 कोठारांचे टेंडर ‘अदानी ऍग्री लॉजिस्टिक्स’ आणि ‘लीप इंडिया’ या दोन कंपन्यांना मिळाले. एकटय़ा अदानींना 9,700 कोटींचे काम मिळाले. हे काम 30 वर्षांसाठी आहे. या कोठारांमध्ये धान्य ठेवण्यासाठी व त्याच्या वाहतुकीसाठी अदानींना पैसे मिळणार आहेत. त्यांच्यासाठीच मोनोपॉलीचा क्लॉज हटवण्यात आला आहे, असे श्रीनेत म्हणाले. ‘कृषी कायद्यांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांना माघार घ्यावी लागली होती. त्यामुळेच अदानीला मागच्या दाराने कृषी व खाद्यान्न पुरवठा क्षेत्रात घुसवण्याचा प्रयत्न आहे,’ असा दावा श्रीनेत यांनी केला.


























































