बापरे! दोन लोकल एकाच ट्रॅकवर समोरासमोर; पनवेल रेल्वे स्थानकाजवळील थरारक घटना, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हार्बर मार्गावर रेल्वे प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना पनवेल रेल्वे स्थानकाजवळ घडली. दोन लोकल गाड्या एकाच वेळी ट्रॅकवर समोरासमोर येत असल्याचे दिसताच प्रवाशांनी अक्षरशः जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला. मोटरमननेही प्रसंगावधान राखून इमर्जन्सी ब्रेक दाबत सुरक्षित अंतरावर लोकल थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकीचा पूर्णपणे विचका झाला. अनेक लोकल विविध स्थानकांदरम्यान खोळंबून पडल्या आणि त्याचा मनस्ताप हजारो प्रवाशांना भोगावा लागला.

मुंबईहून पनवेलकडे आणि पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. पनवेल रेल्वे स्थानकातून फलाटा क्रमांक दोनवरून लोकल सुटली. लोकलने वेगही घेतला. रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर जाताच त्याच ट्रॅकवर समोरून धडाडत येणारी लोकल दिसली आणि प्रवाशांच्या काळजाचा ठोकाच चुकला. अनेकांनी डब्यात मोठ्याने आरडाओरडा केला, परंतु मोटरमनने प्रसंगावधान राखले. इमर्जन्सी ब्रेक अत्यंत कौशल्याने दाबत काही अंतरावर लोकल थांबवली. त्यामुळे दोन लोकलची समोरासमोर होणारी धडक टळली. त्यामुळे साऱ्यांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.

लोकलमधून उतरून पायपीट

या घटनेनंतर हार्बर मार्गावरील वाहतुकीचे तीन तेरा झाले. लोकल जागेवरच अडकून पडल्या. त्यामुळे लोकलमधून उतरून प्रवाशांनी ट्रॅकमधून पायपीट करत पुढची स्थानके गाठली. यात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

चौकशी सुरू

दोन लोकल एकाच वेळी, एकाच ट्रॅकवर समोरासमोर कशा आल्या याबाबत रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

रेल्वे प्रशासनाला ना ताळ ना तंत्र

लोकल का थांबल्या, किती वेळ लागणार याची कोणतीही माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली जात नव्हती. प्रशासनाचे ना ताळ न तंत्र अशीच अवस्था होती. आम्ही प्रवासी आहोत की कैदी, आमची अग्निपरीक्षा कधी संपणार, असा संतप्त सवाल प्रवाशांनी व्यक्त केला.