सोनसाखळी चोरांच्या दोन तासांत मुसक्या आवळल्या, घाटकोपरमध्ये रहदारीचा गैरफायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न हाणून पाडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Crime Delivery Boy Arrested for Theft

जैन मंदिरात पूजा करून घराकडे निघालेल्या 66 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून तिघेजण दुचाकीवरून सटकले. पण घाटकोपर पोलिसांनी फिल्मीस्टाईलने त्यांना अवघ्या दोन तासांत पकडले.

कमलादेवी दोषी (66) या गृहिणी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता जैन मंदिरात पूजा करून घराकडे परतत होत्या. दरम्यान त्या सर्वोदय इस्पितळ परिसरात आल्या असता दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी दोषी यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर स. पो. नि. ज्ञानेश्वर खरमाटे व त्यांच्या पथकाने लगेच आरोपींचा शोध सुरू केला. ते सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना आरोपी घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार खरमाटे यांनी रेल्वे स्थानकाच्या दिशेने धाव घेतली. त्या परिसरात असलेल्या वाहतूकीचा गैरफायदा घेत आरोपींनी विरुद्ध दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. ते नरजेस पडताच खरमाटे यांनी त्यांच्यावर झडप घातली. तरीही ते पळण्याचा प्रयत्न करू लागले. खरमाटे यांनी त्यांना आपल्या दिशेने खेचून धरले. परिणामी तिघेही रस्त्यावर आडवे झाले आणि पकडले गेले. एखाद्या सिनेमात शोभावा अशा पद्धतीने खरमाटे यांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या.