
सातारा जिल्ह्यातील जावळी, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून, शेती पिकांनाही फटका बसला आहे. विशेषतः नुकतीच लागवड करण्यात आलेल्या स्ट्रॉबेरीच्या ‘मदर प्लाण्ट’सह टोमॅटो पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले. त्यानंतर विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू झाला. काही भागांत पावसाचा जोर इतका होता की, रस्त्यांवर पाणी साचले, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला.
महाबळेश्वर, पाचगणी, जावळी आणि वाई परिसरांत सध्या स्ट्रॉबेरीच्या ‘मदर प्लाण्ट’ची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. मदर प्लाण्टच्या वाढीसाठी नियंत्रित हवामानाची आवश्यकता असते.
मात्र, अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे काही शेतांमध्ये पाणी साचल्याने रोपांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी वाऱ्यांमुळे संरक्षक आच्छादने आणि शेडनेटचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याचबरोबर अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या फळांना तडे जाणे, फळगळ होणे, तसेच रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बंगळुरू महामार्गावरील सेवारस्ते जलमय; मोटार अडकली
शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे बंगळुरू महामार्गावरील रायगाव फाटा परिसरातील सेवारस्त्यावर पुन्हा एकदा पाणी साचण्याची समस्या गंभीर स्वरूपात समोर आली. सेवारस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक मोटार अडकून पडली. सुदैवाने वाहनातील सर्व प्रवासी सुखरूप बचावले. स्थानिक नागरिकांनी पिकअपच्या साहाय्याने कार पाण्याबाहेर काढली.

श्रीगोंद्यात डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान
श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदी पट्ट्यात हंगेवाडी, बोरी आणि परिसरात झालेला मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे डाळिंबाची झाडे उखडून पडली. यात झाले आहे. डाळिंब पिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने दखल घेत तलाठी महेंद्र शिंदे आणि कृषी विभागाच्या कृषी सहायक गायकवाड यांनी आज नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. नागवडे साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब कोळपे यांच्यासह दत्तात्रय भाऊ धायगुडे, मोहन श्रीराम धायगुडे, भरत दत्तात्रय धायगुडे, योगेश दत्तात्रय धायगुडे, विजय धायगुडे, सचिन इधाते, कुंडलिक इधाते आणि विठ्ठल रायकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान
टेंभुर्णी परिसरातील केळीबागा भुईसपाट
शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने गार अकोले, टाकळी, आलेगाव, तसेच परिसरातील केळी आणि डाळिंब बागा भुईसपाट झाल्या. प्राथमिक अंदाजानुसार गार अकोले परिसरातील सुमारे २०० ते ३०० एकरवरील केळी व डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. या वादळी पावसात जितेंद्र गायकवाड, हरिदास वाळेकर, तुकाराम पवार, धनंजय वाळेकर, दीपक केचे, गणपत देवकते, शिवाजी देवकते, युवराज केचे, प्रकाश केचे, सागर केचे या शेतकऱ्यांच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

























































