
जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान भारतीय लष्कराला मोठा धक्का बसला आहे. डोंगराळ भागात शोधमोहीम राबवत असताना एका तरुण अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. लेफ्टनंट बेरेशवार गोस्वामी हे मोहिमेदरम्यान खोल दरीत पडल्याने गंभीर जखमी झाले होते. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजौरीच्या जंगल परिसरात संशयित दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली होती. या कारवाईत सहभागी असताना लेफ्टनंट गोस्वामी दुर्गम भागातून पुढे जात होते. त्यावेळी अचानक त्यांचा तोल जाऊन ते दरीत कोसळले. घटना घडताच त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने बचाव मोहीम सुरू केली. अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत त्यांना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांना गंभीर दुखापत झाली होती. वैद्यकीय मदत मिळूनही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
या घटनेनंतर लष्कराने अधिकाऱ्याच्या पार्थिवावर आवश्यक प्रक्रिया सुरू केली असून परिसरातील दहशतवादविरोधी कारवाई कायम ठेवण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण भागात शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.
लेफ्टनंट गोस्वामी यांच्या निधनाबद्दल लष्कराने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना त्यांनी दाखवलेले धैर्य आणि समर्पण प्रेरणादायी असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यांच्या अकाली निधनामुळे लष्करासह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. कर्तव्य बजावत असताना प्राणांची आहुती देणाऱ्या या तरुण अधिकाऱ्याला विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

























































